For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पिक्चर अभी बाकी है

06:59 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
पिक्चर अभी बाकी है
Advertisement

राजकारण हे नेहमीच धक्कादायक असते. होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते असा तो अनिश्चिततेचा प्रवास असतो. भारतीय राजकारण हे अधिक गहिरे, घसरडे आणि तर्काला छेद देणारे म्हणून ओळखले जाते. त्यामुळे राजकारणाची तुलना नेहमी नाटक, सिनेमाशी केली जाते. कथानक चांगले आहे. कथालेखक दर्जेदार आहे. अभिनेते नामांकीत आहेत. दिग्दर्शक अनुभवी आहे. या टिमने चांगले सिनेमे दिले आहेत पण, सगळे चांगले असूनही बॉक्स

Advertisement

ऑफीसवर कसा प्रतिसाद मिळतो यावर चित्रपटाचे यश अपयश मोजले जाते. राजकारणातही मॅजिक फिगर महत्त्वाची. कुणा एकाला भक्कम आघाडी मिळाली व त्याचे नेतृत्व चांगले असेल तर देश बरा चालतो. शेअर बाजारासह उद्योग, व्यापार सुरळीत प्रगती करतो. पण, असे झाले नाही आणि देश चालवायला दोन चाकी, तीन चाकी रिक्षा आली तर राजकारणाचा खोके बाजार होतो. लोकसभा निवडणुकीची घोषणा येत्या आठ पंधरा दिवसात केव्हाही होऊ शकते. सर्व हालचाली त्यादृष्टीने सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासकामांची उद्घाटने आणि कोनशिला बसवण्याचा धडाका लावला आहे तर विरोधी इंडिया आघाडीचे एक नेते राहूल गांधी आपल्या भारत जोडो यात्रेतून मोदी विरोध टोकदार करण्याचा प्रयत्न करत आहेत. राहूल गांधींची यात्रा भारत जोडो असली तरी त्याचे खरे स्वरूप मोदी विरोधक जोडो अशी आहे. या यात्रेने महाराष्ट्रात प्रवेश केला आहे व या यात्रेचे स्वागत व इंडिया आघाडीचा भव्य मेळावा मुंबईत शिवाजी पार्क मैदानात होणार आहे. या सभेचे निमंत्रण काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार वगैरे नेत्यांना दिले आहे आणि निवडणूक निकाल व मतदारांचे जे चाचणी अहवाल समोर येत आहेत ते संमिश्र आहेत. महाराष्ट्रात भाजप मोठा पक्ष असेल पण, इंडिया आघाडी अर्थात महाराष्ट्र विकास आघाडी काही

पॉकेटमध्ये जोरदार दिसत आहे. अर्थात पैलवान व त्याचा खुराक बघून निकाल ठरवता येत नाही. भारतीय मतदार हे निवडणुकीकडे अनेक अंगाने बघत असतात आणि त्यामध्ये जात, धर्म यांचे स्थानही असते. त्यामुळे बॉक्स ऑफीसवर काय होते हे पाहणे महत्त्वाचे. महाराष्ट्रात तर राजकीय पक्षांनी जातीजातीत भांडणे लाऊन आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न चालवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली दहा वर्षातील कामे म्हणजे फक्त ट्रेलर होता.पिक्चर अभी बाकी है असे म्हणत रेल्वेच्या 85 हजार कोटींच्या कामांचे लोकार्पण केले. मिरज पुणे आणि मिरज लोंढा या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाचेही त्यांनी उद्घाटन केले. आपण दहा वर्षात काय केले याची मोठीच्या मोठी जंत्री मोदींकडे आहे. मोदी शहा ही जोडी निवडणूक स्पेशल म्हणूनही परिचीत आहे. पण, इतके असूनही व अबकी बार चारसौ पार असा नारा देऊनही मतपेटीतून काय बाहेर येणार हे नेमके कोणाला सांगता येत नाही म्हणून वेगळ्या अर्थाने हे ट्रेलर झाले, पिक्चर अभी बाकी आहे हे मोदींचे सांगणे लक्षात घ्यायला हवे. भाजप व मोदी शहा जोडी अयोध्येनंतर काशी, मथुरा आणि देशात समान नागरी कायदा या विषयाकडे जाते आणि त्यासाठीच मोदींना केवळ बहुमत नव्हे तर खासदार संख्या चारशे पार हवी आहे. मोदींनी कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शक, स्टारकास्ट चांगली निवडली असली तरी पिक्चर अबी बाकी है हेच खरे. महाराष्ट्रात शरद पवार पावसात भिजले आणि मतदार फिरले हे फार दूरचे उदाहरण नाही. त्यामुळे काहीही होऊ शकते. भाजपाने आणि काँग्रेसने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. अनेकांना तयारीला लागा असे कानात सांगितले जात आहे व काहींची तिकीटे कापली जाणार आहेत. भाजपने पियुष गोयल, सुधीर मुनगंटीवार यांना मैदानात उतरवले असून त्यांना तिकीट जाहीर झाले आहे. देशात काही पक्षांचे उमेदवार जाहीर झाले पण, महाराष्ट्रातील एकही नाव जाहीर झालेले नाही. भाजपाकडून नितीन गडकरी, रावसाहेब दानवे यांची नावे जाहीर झाली आहेत. भाजपा आपल्या मित्रपक्षांना म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा गट व शिवसेना शिंदे गटाला किती जागा सोडणार हे महत्त्वाचे आहे. त्याबाबत होणाऱ्या निर्णयाकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय स्तरावर जागावाटपाबाबत बोलणी सुरु आहे. त्याचप्रमाणे महाआघाडीत उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेस व वंचित यांना किती जागा मिळणार हे बघावे लागेल. वंचितचे अॅङ प्रकाश आंबेडकर महाआघाडीसोबत जाणार आहेत. शिवसेनेसोबत त्यांची युती आहेच पण, त्यांना महाआघाडीत योग्य मान व स्थान मिळत नाही. ओघानेच शेवटच्या क्षणी काय होईल हे सांगता येत नाही. भाजपा विरोधी सारे एकत्र अशी लढत सर्व 48 जागांवर व्हावी असा इंडिया आघाडीचा प्लॅन असला तरी प्रत्येक नेत्यांचे वेगवेगळे संबंध आहेत. आणि समोर विधानसभा निवडणुकाही आहेत. त्यामुळे कागदोपत्री कसेही चित्र रेखाटले गेले तरी प्रत्येक मतदारसंघात बहुरंगी लढती होणार हे स्पष्ट आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न व आंदोलन गाजते आहे. विधीमंडळाचे विशेष अधिवेशन भरवून महायुतीने मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावला आहे. पण, जरांगे पाटील यांना तो मान्य नाही. आता आचारसंहिता लागू होईल तेव्हा आंदोलने रस्त्यावर करता येणार नाहीत पण, वेगळ्या पद्धतीने विषय तापवला जाऊ शकतो. त्यातूनच धाराशिवमध्ये लोकसभेला मराठा समाजाचे एक हजार उमेदवार उभे करायचे ठरवले जात आहे. जरांगे पाटील काय ठरवतात व त्यांना काय सल्ला मिळतो यावर या गोष्टी अवलंबून असल्या तरी महाराष्ट्रात मराठा व ओबीसी या मतपेट्या अस्वस्थ राहतील असा प्रयत्न होताना दिसतो आहे. राहूल गांधींनी महाराष्ट्रात येऊन वीर सावरकर यांचा अवमान केल्यास त्यांना फिरू देणार नाही, असा इशारा मनसेने दिला आहे. राहूल गांधींना अशा विधानातून कोणते समाधान मिळते हे बघावे लागेल. पण, पुढील आठवडा हा महत्वपूर्ण ठरेल, लोकसभेचे रिंगण स्पष्ट होईल, अनेक नाराज पक्ष बदलतील नेत्यांच्या सभा होतील, जागा वाटप, तिकीट वाटप आणि हातात हात, पायात पाय या संदर्भानेही चित्र स्पष्ट होईल. त्या दृष्टीनेही फक्त ट्रेलर झाला आहे. पिक्चर बाकी आहे. भारतीय मतदार शहाणा, सूज्ञ व जबाबदार आहे. आगामी निवडणुकात राजकारणातील सारा गाळ, घाण, कचरा दूर करून नितळ, स्वच्छ आणि उत्तम नेत्यांना तो समर्थन देईल असे मानायला हरकत नाही. तूर्त पिक्चर अभी बाकी है.

Advertisement

Advertisement
Tags :

.