For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आकड्यांचे मायाजाल!

06:41 AM May 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
आकड्यांचे मायाजाल
Advertisement

लोकसभेचे तीन टप्पे पार पडल्यानंतर अचानक पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने प्रकाशित केलेल्या लोकसंख्येच्या अहवालाची सध्या खूपच चर्चा आहे. या अहवालामध्ये गेल्या 65 वर्षांत भारतातील हिंदूंची लोकसंख्या 1950 मधील 84.68 टक्केवरून घटून  78.06 टक्क्यांवर आली तर मुस्लिमांची लोकसंख्या 9.84 टक्केवरून 14.09 टक्के झाली. म्हणजे मुसलमानांची एकूण वाढ 43.15 टक्क्यांनी झाली असा अहवाल दिला आहे. त्यांच्या तुलनेत जैन आणि पारशी लोकांची संख्या कमी झाली तर ख्रिश्चन आणि शीख लोकांची संख्या वाढली असे या अहवालात म्हटले आहे. अर्थातच हा अहवाल काहीही सांगत असला तरीही मुस्लीम समाजाने आपला जन्मदर कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहेच. पण, ती फक्त या देशातील मुस्लिमांनी करावी असे नाही तर वाढती लोकसंख्या पाहता जे या देशातील सर्वात मोठ्या संख्येचे धनी आहेत त्या हिंदूंनीही ही बाब अधिक मनावर घेण्याची गरज आहे. अनेक सुशिक्षित तरुण हिंदू आणि मुस्लीम एकच मुलावर थांबण्याचा निर्णय घेताना आज आपल्या आसपास दिसतात. तरीही आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या राज्यांमध्ये मुस्लीम आणि हिंदू दोघांची वाढती संख्या ही आपल्या समोरची मोठी समस्या आहे. त्यावर उपाय शोधण्यापेक्षा अशा प्रकारचा अहवाल निवडणुकीच्या तोंडावर का प्रसिद्ध झाला हे भारतीय मतदाराला वेगळे सांगावे लागत नाही. त्यात गायपट्ट्यामध्ये सोमवारी मतदान होत आहे. राजकीय नफे, नुकसानीच्या या खेळात ज्याच्या ज्याच्या हाती सत्ता त्याला त्याचा लाभ होतो. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला या आकडेवारीचा लाभ होईल किंवा त्यांच्याकडून वर्षानुवर्षे सांगितले जात असलेल्या थेअरीवर सरकारी मोहोर उमटवली गेली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भाजपच्या या थेअरीवर विश्वास असणारा एक वर्ग आहे. त्यांचा तो विश्वास सहजासहजी ढळणार नाही. ते त्याचा राजकीय लाभ भाजपला देणार. दुसऱ्या बाजूलाही मुस्लिमांना शत्रू बनवून एकाकी पाडण्याचा हा प्रयत्न आहे असे सांगणारा काँग्रेस आणि इतर काही पक्षांचा एक वर्ग आहे. अशा दोन बाजूंना ध्रुवीकरण होऊन प्रत्येक निवडणुकीत हिंदू आणि मुसलमानांची मते विभागली जातात. हे काही नवे नाही. त्यामुळे मोदी यांनी आपल्या या जुन्या वोट बँकेला पुन्हा त्याच विषयावरून जागे करणे किंवा त्यानिमित्ताने इतर पक्षांनी मुस्लिमांना त्याकडे बोट दाखवून जागे करणे हा काही नवा प्रकार नाही. आपल्या सभोवतालची परिस्थिती कशी आहे, आपल्या गल्लीत आणि आपल्या भागात काय स्थिती दिसते याचा अंदाज घेतला तर अशा प्रकारच्या भयातून मुक्तता होऊन प्रत्येक भारतीय स्वत:चे काही ठाम मत बनवून शांततामय जीवन जगू शकतो. वास्तवाला मान्य करून आपले जीवन सुखकर होते. त्याकडे लक्ष दिले तर अशा प्रकारच्या प्रश्नाने कोणाचेही मन विचलित होऊ शकत नाही. भारतीय मतदार जो तटस्थपणे या सगळ्या खेळाला पाहून वेळोवेळी आपली मते कधी भाजपच्या तर कधी काँग्रेसच्या पारड्यात टाकत आला आहे, तो या संदर्भाने आकड्याच्या खेळात न फसता वास्तवाला सामोरा जाईल.  वास्तव हे आहे की, हिंदू आणि मुसलमान यांचे भारतातील लोकसंख्येचे प्रमाण थोड्याफार फरकाने वाढतच चाललेले आहे. हिंदूंची लोकसंख्या 1951 सालच्या जनगणनेनुसार साडेतीस कोटी होती आणि त्यावेळी मुसलमानांची संख्या साडेतीन कोटी होती. 2011 मध्ये भारताची शेवटची जनगणना झाली त्यावेळी हिंदूंची लोकसंख्या साडे 96 कोटी होती तर मुस्लिमांची लोकसंख्या साडे सतरा कोटीच्या जवळ पोहोचली होती.  याचाच अर्थ देशात हिंदूंची किंवा मुसलमानांची लोकसंख्या कमी झालेली नाही. ही लोकसंख्या वाढीचे प्रमाण 2015 या वर्षीच्या हिंदूंचे 2.1 टक्के आणि मुसलमानांचे 2.6 टक्के होते. 2019 ते 2021 च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणामध्ये सुद्धा तो तशाच पद्धतीची वाढीची आकडेवारी दाखवतो. स्वातंत्र्यानंतरच्या इतक्या वर्षात हिंदू आणि मुसलमानांच्यामध्ये आलेल्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक बदलाचा जो काही थोडाफार परिणाम झाला आहे त्यामुळे बदललेल्या मानसिकतेतून आपल्या ऐपतीप्रमाणे आणि पोषणाची जबाबदारी पार पाडू शकतो इतकीच मुले जन्माला घालण्याचा विचार करणाऱ्यांची संख्या दोन्हीही धर्मात वाढीस लागली आहे. हा साक्षर वर्गाने स्वीकारलेला बदल आहे. त्यामुळेच स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या हिंदू कुटुंबात सरासरी आठ, नऊ अपत्ये असायची, तिथे आज एक किंवा दोन इतकीच मुले जन्माला घातली जातात. मुस्लिमांमध्ये सुद्धा हा आकडा दोन ते तीन इथेपर्यंत येऊन पोहोचला आहे. म्हणजे हिंदू आणि मुसलमानांचा जननदर घटत आहे. हा जननदर 41 ते 46 टक्क्यांनी घटत चालला आहे, असेही एका अभ्यासातून पुढे आले आहे. तरीही मुस्लीम समाजातील जमातवाद, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण यामुळे त्यांच्यातील अजूनही मोठी लोकसंख्या अधिक मुले जन्माला घालते आणि मुस्लिमांचा आकडा त्यामुळे वाढता आहे असे मानले तरी तो हिंदूंच्यापेक्षा फार गतीने वाढलेला आहे अशातला भाग नाही. हे सत्य आता बदलत्या काळात स्वीकारणे गरजेचे आहे. आता यातील कोणतीही जात आणि धर्म आपले अस्तित्व हरवून बसेल अशी स्थिती निर्माण होऊ शकणार नाही.  या देशात ज्या जाती आणि धर्म आहेत त्यांना परस्पर सामंजस्याने नेहमीच वाटचाल करावी लागणार आहे आणि तात्कालिक द्वेष कितीही बाळगला तरी कधी ना कधी त्याचा त्याग करून चांगल्या जीवनासाठी एकत्रित प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे आकड्यांच्या फंदात न पडता व्यक्तिगत जीवनात सुधारणा करणे गरजेचे बनले आहे.

Advertisement

Advertisement

Advertisement
Tags :

.