For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्साह, बहिष्कार, बिनविरोध, स्थगित!

01:08 PM Feb 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
उत्साह  बहिष्कार  बिनविरोध  स्थगित
Advertisement

गोव्यातील देवस्थानांच्या निवडणुकांमधील चित्र : आरोप, वाद, तणावासह अटीतटीच्या लढती

Advertisement

प्रतिनिधी / पणजी

बऱ्याच प्रतिष्ठेच्या आणि तेवढ्याच अटीतटीच्या ठरलेल्या राज्यातील शेकडो देवस्थान समित्यांच्या निवडणुका रविवारी पार पडल्या. काही ठिकाणी शांततापूर्ण वातावरणात तर काही ठिकाणी पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचबरोबर काही ठिकाणी बहिष्कार घालण्यात आला तर काही ठिकाणच्या निवडणुका थेट स्थगितच करण्यात आल्या. असे एकूण चित्र राज्यात विविध ठिकाणी दिसून आले. म्हापसा येथील देव बोडगेश्वर मंदिराच्या निवडणुकीस महाजनांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला, येथे मोठ्या प्रमाणात रांगा दिसून आल्या.

Advertisement

निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि या निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी उत्तर आणि दक्षिण जिल्हाधिकाऱ्यांकडून सवोपरी प्रयत्न आणि तयारी करण्यात आली होती. त्यादृष्टीने उपजिल्हाधिकारी, मामलेदार, देवस्थान प्रशासक यांना सर्व आवश्यक निर्देशही जारी करण्यात आले होते. तरीही बऱ्याच ठिकाणी गटातटांच्या राजकारणामुळे वाद, विरोध, बहिष्कार दिसून आला. मात्र कडेकोट पोलिस बंदोबस्तामुळे कुठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद झालेली नाही. निवडणुकीनंतर कालच सर्व समित्यांचे निकालही जाहीर करण्यात आले आहेत.

सांखळी श्रीपांडुरंग देवस्थान अध्यक्षपदी प्रतापसिंह

समित्यांची बिनविरोध निवड झालेल्या काही मंदिरांमध्ये सांखळीतील श्रीपांडुरंग देवस्थानच्या अध्यक्षपदी प्रतापसिंग राणे, पणजीतील श्रीमहालक्ष्मी देवस्थान अध्यक्षपदी श्रीनिवास धेंपे, शिरगांव येथील श्रीलईराई देवस्थान अध्यक्षपदी दिनानाथ शांबा गांवकर, मुळगाव श्रीकेळबाई देवस्थान समिती अध्यक्षपदी कृष्णा परब, नार्वे येथील श्रीसप्तकोटीश्वर देवस्थान अध्यक्षपदी शिरीष सरदेसाई, म्हापसा येथील श्रीविठ्ठल रखुमाई देवस्थान अध्यक्षपदी तुषार टोपले, उसगांव येथील श्रीआदिनाथ देवस्थानच्या अध्यक्षपदी गौतम प्रभू, पिसुर्लेतील महादेव देवस्थान अध्यक्षपदी शंकर परब, कोरगांव कमळेश्वर देवस्थान अध्यक्षपदी प्रकाश शेट्यो, दत्तवाडी केपे येथील श्रीदत्तमंदिर संस्थानच्या अध्यक्षपदी दत्तदास भिसे, रामतळे हळदोणे येथील देव रामतळेश्वर देवस्थान अध्यक्षपदी राजेश साळगांवकर, वाळपई येथील हनुमान देवस्थान अध्यक्षपदी दिलीप कर्पे, आदींचा समावेश होता.

आगरवाडा येथील श्रीनागनाथ भूमिका वेताळ देवस्थानात प्रारंभी बराच वेळ गदारोळ माजला. आरोप प्रत्यारोप करण्यात तब्बल चार तास खर्ची घालवण्यात आले. त्यानंतर एका गटाने निवडणुकीतून थेट माघारच घेतली. त्यामुळे अध्यक्षपदी राजेश नागवेकर (तिसऱ्यांदा) यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

काही ठिकाणी निवडणुकीस स्थगिती

आरोप, वाद, आदींमुळे खडाजंगी होऊन निवडणुकीस स्थगिती देण्यात आलेल्या देवस्थानांमध्ये मये येथील माया केळबाई पंचायतन देवस्थान, साळ येथील श्रीमहादेव भूमिका देवस्थान आदींचा समावेश होता. तसेच कासारवर्णे येथील श्रीसातेरी महादेव देवस्थान यांच्या निवडणुकीवेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद निर्माण झाले. त्यामुळे निवडणुकीस स्थगिती देण्यात आली.

श्री दामोदर देवस्थानात तणाव

जांबावली येथील श्रीदामोदर देवस्थानातही मोठा तणाव दिसून आला. त्यामुळे तणावपूर्ण वातावरणात मतदान झाले. येथे मोठ्या प्रमाणात महाजन असल्याने मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. या देवस्थानचा निकाल नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

वेळुसमध्ये गुरव समाजाचा बहिष्कार 

वेळुस सत्तरीतील रवळनाथ देवस्थानच्या निवडणुकीवर गुरव समाजाने बहिष्कार टाकला. या देवस्थानच्या अध्यक्षपदी राजाराम गांवकर यांची निवड करण्यात आली.

बहुतांश ठिकाणी शांततापूर्ण वातावरण

अन्य सर्व ठिकाणी उत्साहात आणि शांततापूर्ण वातावरणात निवडणुका पार पडल्या. त्यात प्रामुख्याने नानोडा डिचोलीतील श्रीशांतादुर्गा कांदोळकरीण देवस्थान अध्यक्षपदी चिन्मय फळारी, श्री शांतादुर्गा कुंकळकरीण देवस्थान अध्यक्षपदी विनोद देसाई, बांदोडा येथील श्रीमहालक्ष्मी संस्थान अध्यक्षपदी हर्षद गोविंद कामत, सावईवेरे येथील श्रीअनंत देवस्थान अध्यक्षपदी राहूल शेट वेरेकर, काकोडा कुडचडे येथील श्रीमहादेव देवस्थान अध्यक्षपदी प्रतित प्रभूदेसाई, पर्रा येथील श्रीलिंगाभाट देवस्थान अध्यक्षपदी वासुदेव शिरसाट, धडे सावर्डे येथील श्रीवेताळ देवस्थान अध्यक्षपदी मोहन गांवकर, पार खांडेपार येथील श्रीगणनाथ देवस्थान अध्यक्षपदी पुंडलिक शेट पारकर, हळर्ण पेडणे येथील श्रीसातेरी देवस्थान अध्यक्षपदी बापू परब, सांखळी राधाकृष्ण देवस्थान अध्यक्षपदी राजदत्त मापारी, तुये पेडणेतील भगवती पंचायतन संस्थान अध्यक्षपदी चंद्रशेखर नाईक तुयेकर, गिरवडे येथील भूमिका सातेरी रवळनाथ देवस्थान अध्यक्षपदी अरविंद लिंगुडकर, अडवलपाल येथील शांतादुर्गा देवस्थान अध्यक्षपदी अर्जुन गांवककरपोंबुर्फा येथील श्रीशांतादुर्गा रवळनाथ देवस्थान अध्यक्षपदी शिवदत्त शेट्यो, आदींचा समावेश होता. बहुतांश ठिकाणी विद्यमान समित्यांचे अनेक पदाधिकारी पुन्हा विजयी झाले आहेत.

Advertisement
Tags :

.