For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खेळातून शारीरिक तंदुरुस्ती हेच माझे ‘पॅशन’ : जय शेट वेरेकर

06:00 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
खेळातून शारीरिक तंदुरुस्ती हेच माझे ‘पॅशन’   जय शेट वेरेकर
Advertisement

पन्नासच्यावर मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग: आयर्नमॅन 70.3 गोवा पूर्ण करणारा गोमंतकीय

Advertisement

नरेश गावणेकर /फोंडा

जिद्द, क्षमता व गुणवत्ता असल्यास कुठलाही खेळ कोणत्याही वयात आत्मसात करून त्यात प्राविण्य मिळविणे शक्य असते. शारीरिक तंदुरुस्तीसाठी तसेच छंद म्हणून एखादा खेळ खेळाडू जोपासू शकतो. फोंडा-गोवा येथील जय जगदीश शेट वेरेकर या अॅथलेटने वयाच्या 35 व्या वर्षी मॅराथॉन धावण्याला सुऊवात केली. खरे म्हणजे खेळात ही निवृत्तीचे वय. पण आज तो या खेळात उच्च कामगिरी बजावत आहे. आजपर्यंत त्याने 5 फूल मॅराथॉन (42.2 कि. मी.) व 50 च्या वर हाफ मॅराथॉन (21 कि. मी.) मध्ये भाग घेऊन त्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोव्यात होणाऱ्या ‘आयर्नमॅन 70.3 गोवा’ स्पर्धेत 2023 साली सहभागी होऊन ती पूर्ण करणारा गोमंतकातील मोजक्याच अॅथलेटपैकी वेरेकर हा एक अॅथलेट ठरला आहे. आयर्नमॅन 70.3 मध्ये रनिंग, स्वीमिंग व सायक्लींग या तीन प्रकारात आपले कौशल्य दाखवावे लागते.

Advertisement

जय शालेय जीवनापासून बास्केटबॉल खेळत असे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी त्यांनी हा खेळ सुरुच ठेवला होता. नंतर दुखापतीमुळे त्याने खेळणे सोडून दिले. लग्नानंतर त्याची पत्नी मानसी हिने वास्को येथे 2015-16 साली झालेल्या गोवा रिव्हर मॅराथॉनमध्ये 10 कि. मी. च्या पल्ल्यात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी केली. तिला सहकार्य करण्यासाठी त्यानेही या स्पर्धेत भाग घेण्याचे ठरविले. त्यासाठी दोघेही सराव करू लागले. त्याने प्रथमच मॅराथॉनमध्ये भाग घेतला होता. व ती पूर्ण केली. त्यानंतर फोंड्यात होणाऱ्या डॉ. रामाणी गोवा मॅराथॉनमध्ये तो सहभागी झाला. 10 कि. मी. च्या पल्ल्यासाठी त्याने नावनोंदणी केली होती. पण चुकून तो त्या टप्प्याच्या पुढे गेला व चक्क त्याने 21 कि. मी. चा पल्ला पार केला. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास बळावला आणि त्यानंतर नियमित तो मोठ्या स्पर्धेत सहभागी होऊ लागला. पत्नीमुळेच त्याने या क्षेत्रात प्रवेश केला हे तो सांगतोय.

गोवा रिव्हर मॅराथॉन, डॉ. रामाणी गोवा मॅराथॉन, रोटरी रेन रन पणजी, बोरी माऊंटन रन, आयएनएस मांडवीची नेव्ही रन अशा गोव्यातील नामांकित स्पर्धांबरोबरच सातारा, बेळगाव व मुंबई येथे होणाऱ्या मॅराथॉन स्पर्धेत तो सहभागी होत आहे. गतसाली नेव्ही रन स्पर्धेत त्याने द्वितीय क्रमांक तर गोवा रिव्हर मॅराथॉनमध्ये पाचवा क्रमांक पटकावला होता. मगळूर येथे झालेल्या ट्रायथ्लोन स्पर्धेत त्याला तृतीय स्थान प्राप्त झाले होते. याशिवाय स्थानिक मॅराथॉन स्पर्धांमध्ये त्याने अनेक पारितोषिके पटकावली आहेत.

आयर्नमॅन 70.3 गोवामध्ये सहभाग

2023 साली जयने आयर्नमॅन 70.3 गोवा स्पर्धेत भाग घेतला. यात 1.9 कि. मी. स्वीमिंग, 90 कि. सायकलींग व 21.1 कि. मी. रनिंग करावे लागते. तिनही प्रकारात मिळून एकूण 113 कि. मी. (70.3 मैल) अंतर कापावे लागते. जयने ही स्पर्धा 7 तासांच्या आत पूर्ण केली. ही स्पर्धा एक अमेरिकन कंपनी आयोजित करते. यात जगभरातील 50 हून जास्त देशातील स्पर्धक भाग घेत असतात.

छंद जोपासण्यासाठी भरपूर सराव

43 वर्षीय जय हा प्रसिद्ध ज्येष्ठ नाट्याकर्मी जगदीश शेट वेरेकर यांचा सुपूत्र आहे. त्याने सिव्हील इंजिनियरींगमध्ये पदवीका संपादन कऊन वडिलांचा लाकूड व्यवसाय सांभाळत आहे. मॅराथॉन व ट्रायथ्लॉन खेळाचा छंद जोपासण्यासाठी तो भरपूर मेहनत घेत आहे. ‘आमी अंत्रुज रनर्स’ या ग्रुपशी तो निगडीत असून त्यांच्यासोबत तो धावण्याचा सराव करीत असतो. आठवड्यात तीन वेळा त्याचा सराव असतो. रनिंग, स्वीमींग व सायक्लींगसाठी प्रत्येकी एक दिवस ठरलेला असतो. सायक्लींग 100 कि. मी., स्वीमींग 1.5 कि. मी. व रनिंग 12 ते 15 कि. मी. चा सराव करत असतो. इतर दिवशी घरीच व्यायाम करतो. यात वेट ट्रेनिंगचा समावेश असतो. त्याचबरोबर योग व प्राणायाम करतो.

शारीरिक तंदुरुस्ती हेच ‘पॅशन’

निरोगी व आनंदी जीवन जगण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची आहे. यासाठी व्यायाम व योग्य आहार घेणे गरजेचे असते. युवा खेळाडूंनी कोणत्याही खेळात उच्च ध्येय गाठण्यासाठी त्या क्षेत्रातील प्रशिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे. चांगली झोप व पौष्टिक आहार यासाठी आहार तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, असे त्याचे म्हणणे आहे. कुठल्याही स्पर्धेत आपण ‘मेडल’साठी सहभागी होत नसून खेळातून निखळ आनंद मिळविणे हाच त्यामागील मुख्य हेतू आहे. शारीरिक तंदुरुस्ती व आनंदी जीवनासाठी आपण हा छंद सुरुच ठेवणार असल्याचे तो सांगतो.

Advertisement
Tags :

.