For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वातंत्र्यापुर्वीच साकारली फुलेवाडी... कोल्हापुरातील पहिली गृहनिर्माण सोसायटी

01:08 PM Apr 11, 2025 IST | Radhika Patil
स्वातंत्र्यापुर्वीच साकारली फुलेवाडी    कोल्हापुरातील पहिली गृहनिर्माण सोसायटी
Advertisement

कोल्हापूर / सुधाकर काशीद : 

Advertisement

कोल्हापूरची हद्द पश्चिमेकडे ओलांडली की रंकाळ्याचा आडवा पाट आणि त्याच्यापुढे डाव्या हाताला एक विस्तीर्ण असा माळ होता. वस्ती अतिशय कमी होती. मात्र या माळरानावर चरणारी दुभती जनावरे हा अनेक कुटुंबाचा आधार होती. कोल्हापूरच्यालगत. पण धड शहरी नाही आणि धड ग्रामीण नाही, अशी या परिसराची ओळख होती. या माळावर गवती कुरणे, काही जणांची शेती जरूर रुजली. पण याच माळावर सहकाराची बीजे आणि तीही देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या काळात येथे हळूहळू रुजली गेली. नुसती रुजलीच, असे नव्हे तर त्यातून एक सहकारी तत्त्वावरील संस्थेनेही मूळ धरले आणि चक्क महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने या माळाचे रूपांतर फुलेवाडी असे झाले. सहकार तत्त्वावरील पहिली हाऊसिंग सोसायटी म्हणून फुलेवाडी हे नाव देशभरात जाऊन पोहोचले.

भविष्याचा वेध घेणारी मंडळी आपल्या आसपास असतील तर त्यातून काय घडू शकते, याचे फुलेवाडी एक उदाहरण. कारण त्यानंतर अनेक ठिकाणी फुलेवाडीचा आधार गृहनिर्माण सोसायटी स्थापन करण्यासाठी घेण्यात आला. 1946 म्हणजे तो 70-80 वर्षांपूर्वीचा काळ. कोल्हापूरही त्यावेळी एका मर्यादित क्षेत्रातच होते. स्वतंत्र नगर किंवा स्वतंत्र वाडी स्थापन करून गरजू लोकांसाठी घर बांधणी करणे, ही कल्पनाही त्यावेळी प्रचलित नव्हती. पण असे म्हणतात, की कोल्हापूरच्या रक्तातच सहकार मुरला आहे. त्यामुळे श्रीपतराव बोंद्रे, पांडुरंग दादोबा माने, बाबुराव गायकवाड, श्रीपतराव तुकाराम पाटील, गोपाळ साळोखे, यशवंत राजाराम पाटील, भागोजी तुकाराम पाटील, श्रीपती रामजी पाटील, गणपती भाऊ पालकर, गणपत रामचंद्र पाटील, दगडू बापू पाटील, रंगराव दत्तोबा जाधव ही मंडळी एकत्र आली आणि त्यांनी सहकारी हौसिंग सोसायटीची कल्पना मांडली.

Advertisement

त्यावेळी कोल्हापूर नगरपालिकेला जे. पी. नाईक यांच्यासारखे खूप वेगळे आणि द्रष्टे मुख्याधिकारी होते. त्यांच्यापर्यंत ही कल्पना गेली आणि ती कल्पना कागदावर उतरू लागली. या जागेत सर्व थरातील घटकांना संधी मिळावी म्हणून तर कमी, मध्यम, जादा व व्यापार क्षेत्र अशी विभागणी केली गेली आणि आज पटणारच नाही, इतक्या नाममात्र दरात प्लॉटचे लिज आणि प्लॉट पडायला सुरुवात झाली. दहा रुपये स्क्वेअर फुटापासून ते त्यावेळी 210 रुपये भरून घेऊन प्लॉट दिले जाऊ लागले. अर्थात सहकारी संस्था असल्याने प्लॉटधारक लिज होल्डर झाले आणि या हौसिंग सोसायटीला महात्मा फुले यांचे नाव देऊन आपले एक सामाजिक अंग या सोसायटीने दाखवून दिले. कॉलनी, नगर असे नाव न ठेवता वाडी हा ग्रामीण स्पर्श असलेल्या शब्दाची जोड देऊन ‘फुलेवाडी’ असे नाव दिले गेले

साहजिकच सुरुवातीला पाण्याची सोय नव्हती. लाईटची सुविधा नव्हती. दोनच पाण्याचे नळ होते. सोसायटीने पाण्याची स्कीम केली. लाईटची सोय केली. या माळावर फुलेवाडी वसली गेली. पण पहिल्यांदा घरे फार कमी होती, श्रीपतराव पाटील, भागोजी पाटील, श्रीपतराव पाटील, रामचंद्र पाटील, पांडुरंग माने, दादोबा पाटील, श्रीपतराव पाटील, गोपाळ नाथा पाटील, आनंदराव भिसे यांनी सुरुवातीला घरे बांधली. व हळूहळू इतर लोक घरे बांधण्यास पुढे येऊ लागले. सर्व व्यवहार सोसायटीच्या अतिशय कडक अशा माध्यमातून होऊ लागले, अगदी प्लॅननुसार घरे बांधली जाऊ लागली. रस्त्याची रुंदी, बाग, मंदिर, बाजारपेठ, दवाखाने यासाठी विस्तीर्ण जागा सोडण्यात आली आणि बऱ्यापैकी फुलेवाडी कुटुंबाच्या वर्दळीत आज फुलेवाडी एक नियोजनपूर्वक उभी राहिलेली सोसायटी आहे.

रुंद रस्ते, मैदान, हॉस्पिटल, सार्वजनिक हॉल, मंडई, देऊळ, शाळा, क्रीडांगण अशा सर्व सोयी फुलेवाडीत आहेत. दत्त मंदिर म्हणजे येथे केवळ धार्मिक ठिकाण नाही तर, 51 रुपये भाड्यात दत्ताचे मंदिर लग्नकार्यासाठी भाड्याने देण्याची कल्पना येथे प्रत्यक्षात राबवली गेली आणि असंख्य गोरगरीब मध्यमवर्गियांच्या घरातील लग्ने फक्त 51 रुपये या हॉल खर्चात पार पडली. मुलांच्या शिक्षणाची सोय झाली. क्रीडांगणाच्या सोयीमुळे फुलेवाडीची स्वतंत्र फुटबॉल टीम कोल्हापुरात नावावर उदयास आली. फुलेवाडीची महापालिका शाळा पीएम योजनेची मानकरी ठरली. फुलेवाडी दूध सोसायटीत दूध घालण्यासाठी आणि विक्रीसाठी रोज रांग लागू लागली. सकाळचे व संध्याकाळचे सहा वाजले याची जाणीव भोंगा वाजवून करून दिली जाऊ लागली. पहाटे भक्तिगीतांची हलकीशी धुन हमखास कानावर पडेल, अशी पद्धत दत्ताच्या देवळात सुरू झाली.

अर्थात फुलेवाडी आता स्टार वसाहत झाली आहे. अवघ्या चारशे-पाचशे रुपयात सहकारी तत्त्वावरील जागेचा दर आता 3 हजार ते 4 हजार स्क्वेअर फुट असा झाला आहे. तरीही फुलेवाडीत राहण्यासाठी लोकांची धडपड आहे. स्वतंत्र फायर फायटर आहे. चिरमुरे, फुटाणा, शेंगदाण्यापासून पिझ्झा बर्गरही मिळतो आहे. रात्रभर चालू राहणारं मेडिकल शॉप आहे. तीन ते चार मोठी हॉस्पिटल आहेत. अगदी मुंबई आईक्रीमही फुलेवाडीत मिळते आहे. त्यामुळे फुलेवाडी ही कोल्हापुरातील एक स्वच्छ सुंदर आणि स्टार सोसायटी झाली आहे आणि कोल्हापूरच्या समाज जीवनाचा एक मोठा घटक बनून गेली आहे.

Advertisement
Tags :

.