हजार वर्षे काढणार फोटो
अमेरिकेने एक अद्भूत कॅमेरा विकसित केला आहे. हा कॅमेरा पुढची एक हजार वर्षे छायाचित्रे घेत राहणार आहे. अमेरिकेच्या टस्कन शहरात तो प्रस्थापित करण्यात आला असून ‘मिलेनियम प्रोजेक्ट’ नामक प्रकल्पाच्या अंतर्गत त्याची निर्मिती करण्यात आली आहे. या कॅमेऱ्याने आपले काम सुरू केले आहे. जोनाथन किटस् नावाच्या तंत्रज्ञाने त्याची रचना केली असून अॅरिजोना विद्यापीठात ते सेवारत आहेत. हा सहस्त्रक कॅमेरा एका विशेष प्रयोगासाठी निर्माण करण्यात आला आहे. जगातील सर्वात कमी वेगाने छायाचित्रे काढणारा कॅमेरा अशी त्याची ओळख आहे. छायाचित्रीकरणासाठी तो एक हजार वर्षांचा अवधी घेणार आहे. या कॅमेऱ्यात टस्कन शहरातील पुढच्या एक हजार वर्षातील सर्व व्यक्ती आणि वास्तू तसेच निर्जीव वस्तू यांची छायाचित्रे संकलित झालेली असतील. हा संपूर्ण कॅमेरा एका स्तंभावर स्थापित करण्यात आलेला आहे. त्याची रचना पीनहोल कॅमेऱ्यासारखी आहे. एक हजार वर्षापूर्वी या प्रकारचा कॅमरा तयार करण्यात आला होता असे सांगितले जाते. हा कॅमेरा तांबे आणि 24 कॅरेट सोने या धातूंपासून निर्माण करण्यात आला आहे. या कॅमेऱ्याचे तोंड टस्कन शहरानजीक असणाऱ्या वाळवंटाकडे वळवले आहे. या कॅमेऱ्याचे निर्माते किटस् यांचे म्हणणे असे आहे की दहा शतके हा कॅमेरा कार्यरत राहिल. त्यात डोंगर, दऱ्या, वाळवंटे इत्यादी स्थायी निसर्गनिर्मित प्रस्थापनांची छायाचित्रे असतील तसेच व्यक्ती, इमारती, झाडे, झुडुपे इत्यादी नित्य परिवर्तनीय वस्तूंचीही छायाचित्रे असतील. या कॅमेऱ्याने बरीच उत्सुकता निर्माण केली असून तो पाहण्यासाठी टस्कन शहरात मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोक आणि पर्यटक येत आहेत.