Kolhapur Crime : इचलकरंजीत अल्पवयीन मुलीला त्रास देणारा वृद्ध महिलांच्या ताब्यात; बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली
चॉकलेटचे आमिष दाखवून गैरवर्तन करणारा ६० वर्षीय नराधम अटकेत
इचलकरंजी : इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या एका गावामध्ये गेल्या सहा महिन्यापासून अल्पवयीन मुलीला चॉकलेट बिस्किट गोळ्याचे आमिष दाखवून गैरवर्तन करणाऱ्या वृद्धास महिलांनी बेदम चोप देऊन शहापूर पोलिसांच्या हवाली केले. दशरथ भाऊ सोनटक्के (वय ६० रा. चौंडेश्वरी कॉलनी तारदाळ) असे या त्याचे नाव असून या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
नराधम दशरथ सोनटक्के हा गेल्या सहा महिन्यापासून पीडित मुलगी शाळेत जात असताना तिला चॉकलेट व गोळ्यांचे आमिष दाखवून गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करत होता. तसेच पाठलाग करीत होता. पीडित मुलीने काल ही घटना आई-वडिलांना सांगितली. याचा आई-वडिलांनी जाब विचारल्यावर उद्धट उत्तरे देऊ लागला.
याची माहिती मिळताच सकाळी साडेआठच्या सुमारास संतप्त महिलांनी र त्याला बेदम चोप देऊन त्याची धिंड काढली. याची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दशरथ सोनटक्के याला ताब्यात घेऊन शहापूर पोलीस ठाण्यात आणले. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार शहापूर पोलिसांनी त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.