For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वोच्च न्यायालयात नीट प्रकरणी याचिका

06:30 AM Jun 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
सर्वोच्च न्यायालयात नीट प्रकरणी याचिका
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

देशभरातील विद्यार्थी नीटच्या आयोजनात अनियमितता झाल्याचा आरोप करत आहेत. सुमारे 20 हजार विद्यार्थ्यांनी कोटा येथील शिक्षणतज्ञ नितिन विजय यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. नीट पुन्हा आयोजित व्हावी किंवा ग्रेसिंग मार्क संपुष्टात आणले जावेत अशी मागणी या अर्जाद्वारे करण्यात आली आहे. नीटमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत करण्यात येणाऱ्या डिजिटल सत्याग्रहाच्या अंतर्गत सुमारे 20 हजार विद्यार्थ्यांनी स्वत:ची तक्रार केली आहे.

यंदा ऑल इंडिया फर्स्ट रँकवर 67 विद्यार्थी राहिले आहेत. पहिल्या क्रमांकावर इतक्या अधिक संख्येत विद्यार्थी कसे आले? विद्यार्थ्यांना 720 पैकी 718, 719 गुण कसे दिले गेले? कारण विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली तर 720 गुण मिळतात आणि एकाही प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिले तर मायनस मार्किंगमुळे कमाल 715 गुण मिळू शकतात. एक प्रश्न सोडून दिला तर 716 गुण मिळू शकतात असे विद्यार्थ्यांनी स्वत:च्या याचिकेत म्हणत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. एनटीएकडून 14 जून रोजी निकाल जारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले, परंतु 10 दिवस अगोदरच म्हणजेच 4 जून रोजी संध्याकाळी निकाल जाहीर करण्यात आला, यामागे कोणते कारण आहे असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

Advertisement

यंदा नीट ची कट ऑफ अत्यंत अधिक आहे. यात एकाच वर्षात 45 गुणांची वाढ दिसून आली आहे. मागील वर्षी एकीकडे 605 क्रमांकावर 26 हजार 485 विद्यार्थी होते, यंदा ही संख्या 76 हजार कशी झाली हे समजण्यापलिकडे असल्याचे याचिकेत म्हटले गेले.

ग्रेसमार्क्सवर आक्षेप

ग्रेसमार्क्समुळे अनेक विद्यार्थी टॉपर लिस्टपर्यंत पोहोचले आणि अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण असूनही त्यांचे रँकिंग खालावले आहे. याचिकेत ग्रेस मार्क्सवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. एनटीएने सेंटर्सवर सीसीटीव्ही फुटेज आणि तेथील कर्मचाऱ्यांचा अहवाल तसेच विद्यार्थ्यांच्या एफिशिएंसीच्या आधारावर ग्रेस मार्क्स दिल्याचे म्हटले आहे. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याच्या पेपरला 15 मिनिटे विलंब झाल्यास त्याला मिनिटाच्या हिशेबाने गुण देण्यात आले किंवा अन्य पद्धत अवलंबिण्यात आली हे स्पष्ट नाही. विद्यार्थ्यांच्या पेपरला विलंब झाला आणि अचूकतेच्या आधारावर ग्रेसिंग मार्क्स देण्यात आल्याचे एनटीएकडून सांगण्यात आले.

सीसीटीव्ही फुटेज अन् अचूकता

ऑफलाइन परीक्षेत सीसीटीव्ही फुटेज किंवा केंद्रावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आधारावर विद्यार्थ्यांची अचूकता कशी ठरविली जाऊ शकते असा प्रश्न याचिकाकर्त्यांच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. ग्रेसिंग मार्क्सवरून एनटीए न्यायालयाच्या निर्देशाचा दाखला देत आहे. हे निर्देश क्लॅटसाठी 2018 मध्ये देण्यात आले होते. परंतु ती ऑनलाइन परीक्षा होती. तर नीट ही ऑफलाइन परीक्षा आहे. त्या निर्देशाचा दाखला देत ग्रेस मार्क्स देणे योग्य कसे ठरू शकते असा सवाल करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.