For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केजरीवालांच्या कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ

09:45 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
केजरीवालांच्या कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ
Advertisement

ईडी प्रकरणी 31 जुलैपर्यंत तुरुंगात राहणार : सीबीआयकडूनही चौकशी

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

दिल्ली अबकारी धोरणाशी निगडित भ्रष्टाचाराप्रकरणी राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी 8 ऑगस्टपर्यंत वाढविली आहे. केजरीवाल यांना तिहार तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी हजर करण्यात आले. ईडीकडून नोंद मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी केजरीवालांना 31 जुलैपयंत तुरुंगात रहावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने केजरीवालांना 12 जुलै रोजी जामीन मंजूर केला होता, परंतु अद्याप त्यांच्याकडुन जामीन बाँड भरण्यात आलेला नाही.

Advertisement

केजरीवालांना ईडीने 21 मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर सीबीआयकडून त्यांच्या विरोधात दुसरा गुन्हा नोंदविण्यात आला. सीबीआयने केजरीवालांना 26 जून रोजी अटक केली होती. न्यायालयाने केजरीवालांसोबत मनीष सिसोदिया, बीआरएस नेत्या के. कविता आणि अन्य आरोपींची न्यायालयीन कोठडीही 31 जुलैपर्यंत वाढविली आहे.

यापूर्वी 17 जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवालांना सीबीआयकडून झालेल्या अटकेला आव्हान देणारी याचिका आणि अंतरिम जामिनाच्या याचिकेवर स्वत:चा निर्णय राखून ठेवला होता. जामीन याचिकेवर 29 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. केजरीवाल हे जनतेने निवडलेले मुख्यमंत्री आहेत, दहशतवादी नव्हेत असे त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी मागील सुनावणीवेळी म्हटले होते. तसेच त्यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा उल्लेख केला होता. इम्रान खान यांची एका प्रकरणातून मुक्तता होताच लगेच दुसऱ्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. भारतात असा प्रकार घडू नये असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला होता.

ईडीकडून सातवे पुरवणी आरोपपत्र

9 जुलै रोजी ईडनी दिल्लीच्या राउज अॅव्हेन्यू न्यायालयात सातवे पुरवणी आरोपपत्र दाखल केले. 208 पानांच्या या आरोपपत्रात केजरीवाल यांना या घोटाळ्याचा सूत्रधार ठरविण्यात आले आहे. घोटाळ्यातून प्राप्त झालेली रक्कम आम आदमी पक्षाकरता खर्च करण्यात आल्याचा उल्लेख आरोपपत्रात आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या प्रचाराकरता ही रक्कम खर्च करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.