अजमेर दर्गा सर्वेक्षणाची याचिका सादर
वृत्तसंस्था/जयपूर
राजस्थानातील प्रसिद्ध अजमेर दर्ग्यात पुरातन शिवमंदीर आहे, असे प्रतिपादन हिंदू सेना या संघटनेने केले असून या संदर्भात याचिका सादर करण्यात आली आहे. न्यायालयाने ही याचिका सुनावणीकरिता स्वीकारली असून या दर्ग्याचे पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी याचिकेत आहे. न्यायालयाने ही याचिका स्वीकारल्याने आता लवकरच सुनावणी होण्याची शक्यता असून या दर्ग्याच्या पुरातत्व सर्वेक्षणाचाही आदेश दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हिंदू सेनेने आपल्या याचिकेसह अनेक पुरावेही न्यायालयाला सादर केले आहेत. अजमेर शरीफ दर्गा हे हिंदू मंदीरच आहे, हे सर्वेक्षणातून स्पष्ट होईल. हे मंदीरच आहे, याचे अनेक कागदोपत्री पुरावे आहेत. तसेच ऐतिहासिक नोंदी आहेत, असे प्रतिपादन याचिकेत करण्यात आले आहे. या याचिकेवर मंगळवारी प्राथमिक सुनावणी झाली. हा दर्गा हे मंदीरच आहे हे सिद्ध करणारा एक विशेष ग्रंथ न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 नोव्हेंबरला असून या सुनावणीनंतर सर्वेक्षणा आदेश दिला जाऊ शकतो. त्यामुळे पुढच्या सुनावणीसंबंधी उत्सुकता निर्माण झाली आहे.