‘फेंगल’ वादळ तामिळनाडूच्या दिशेने
पूर्व किनारपट्टीला झोडपणार, अद्यापही धडकेचे स्थान अस्पष्ट, महाराष्ट्रात प्रभाव नाही
पुणे
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फेंगल’ चक्रीवादळ श्रीलंकेला तडाखा देत तामिळनाडूच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. या वादळाचा तडाखा पूर्व किनारपट्टीला बसणार असून, पुढे ते वळण घेण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे अद्यापही या वादळाचा लॅन्डफॉल निश्चीत झालेला नाही. दरम्यान, या वादळामुळे तामिळनाडू, पाँडेचरी, आंध्र, रायलसीमा, ओरिसा तसेच पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे या वादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे हवामान तज्ञाचे म्हणणे आहे.
बंगालच्या उपसागरात न्यून दाबाच्या क्षेत्राचे बुधवारी रात्री फेंगल या चक्रीवादळात ऊपांतर झाले. तत्पूर्वी या क्षेत्राने श्रीलंकेच्या किनारपट्टीला मोठा तडाखा दिला असून, येथे मोठ्या प्रमाणात पावसाने झोडपले आहे. पुढे क्षेत्र त्याच्या उत्तरपश्चिमेच्या दिशेने प्रवास करीत असून, रात्री त्याचे वादळात ऊपांतर झाले. वादळ तामिळनाडूच्या दिशेने प्रवास करीत असून, दोन दिवसांत ते तामिळनाडूच्या किनारपट्टीजवळ येण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, अद्यापही वादळ कुठे धडकणार याचा अंदाज वर्तविण्यात आला नाही. परंतु वादळ संपूर्ण पूर्व किनारपट्टीला तडाखा देत त्यानंतर वळण घेत, पश्चिम बंगालकडे जाण्याची शक्यता आहे. या वादळाच्या प्रभावामुळे पूर्व किनारपट्टीवरील सर्व राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच समुद्र खवळलेला राहणार असून, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याची सूचना आहे.
मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा प्रभाव नाही
या वादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही.राज्यात थंडीचा प्रभाव वाढला असून, नगर येथे 9.4 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. उत्तर तसेच मध्य भारतात थंडीचा कडाका अधिक मआहे. अनेक भागात तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. मराठवाडा आणि विदर्भातही थंडीचा प्रभाव जास्त आहे.