Kolhapur News : कोल्हापुरात सोलर पॅनेल बसवताना विद्युत धक्क्याने व्यक्तीचा मृत्यू
कोल्हापूरात सोलर बसविताना भीषण अपघात
कोल्हापूर : सोलर पॅनेलचे साहित्य टेरेसवर नेत असताना मुख्य विद्युत वाहिनीस पाईपचा स्पर्श होवून विजेचा शॉ क लागल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. रवींद्र रंगराव जाधव (वय ५२, रा. आयरेकर गल्ली, शिवाजी पेठ) असे मृताचे नाव आहे. तर त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात सौरभ संजय साळुखे (वय २४, रा. ताराबाई रोड, मूळ रा. तासगाव) हा गंभीर जखमी
झाला.
याबाबत माहिती अशी की, शिवाजी पेठ येथील ताराबाई रोडवर रवींद्र जाधव याचे तीन मजली आरसीसी घर आहे. पिण्याच्या पाण्याची एजन्सी ते चालवत होते. मंगळवारी त्यांनी घरामध्ये बसविण्यासाठी नवीन सोलर खरेदी केला होता. याचे साहित्य दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास टेरेसवर नेत होते.
यावेळी एका लोखंडी पाईप दोरीच्या सहाय्याने वरच्या मजल्यावर घेत असताना, एका पाईपचा रस्त्यावरील मुख्य विद्युतवाहक तारेला स्पर्श झाला. याचा झटका रवींद्र जाधव यांच्या हातातील पाईपला लागला. यामुळे रविंद्र जाधव हे काही अंतरावर पडले. त्यांच्या हातातील पाईप बाजूला घेण्याच्या प्रयत्नात सौरभ साळुंखे यालाही विजेचा झटका लागल्याने तोडी जखमी झाला. बेशुद्धावस्थेत जाधव यांना सीपीआरमध्ये आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे.
काम करत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास
मुळचा तासगांव येथील सौरभसाळुंखे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो आहे. याचसोबत आयरेकर गल्लीतील एका यात्री निवासमध्ये तो अर्धवेळ काम करतो. मंगळवारी रवींद्र जाधव यांनी त्याला मदतीसाठी बोलावले होते. अशातच जाधव यांना विजेचा झटका लागल्याचे पाहून तो मदतीला धावला. यामध्ये जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.