महाराष्ट्र एकीकीरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाकारल्यास कर्नाटकची वाहने अडवू
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा इशारा
कोल्हापूर
बेळगाव येथे ९ डिसेंबर रोजी महाराष्ट्र एकीकीरण समितीच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कर्नाटक सरकार आणि बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी या मेळाव्यास परवानगी द्यावी. परवानगी नाकारल्यास महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करुन कर्नाटकातील वाहनांना अडवण्याचा इशारा दिला. याबाबचे निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.
बेळगाव येथे कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन ९ डिसेंबर पासून सुरु होत आहे. या अधिवेशन काळात महाराष्ट्र एकीकीरण समितीने ९ रोजी महामेळावा आयोजित केला आहे. या महामेळाव्याला रीतसर परवानगी मिळावी यासाठी बेळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला आहे. पण गेल्या तीन ते चार वर्षातील अनुभव पाहता कर्नाटक सरकार समितीला महामेळावा घेऊ देत नाही. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये बंदी घातली जाते. हे लोकशाहीला धरुन नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले. कर्नाटक सरकार आणि बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी या मेळाव्यास परवानगी द्यावी. परवानगी नाकारल्यास महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करु. तसेच सीमेवर कर्नाटकची वाहने अडवू. यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार, सह संपर्क प्रमुख विजय देवणे, विशाल देवकुळे, धनाजी दळवी, अनिकेत घोटणे, दिनेश साळोखे, सुहास डोंगरे, युगंधर कांबळे, अतुल परब, विकी काटकर, प्रवीण पालव, पूनम फडतारे ,नागेश पोवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
तर वाहनांच्या चाकातील हवा सोडू
अधिवेशन काळात कर्नाटकचे बहुतांश मंत्री कोल्हापूरात श्री अंबाबाईच्या दर्शनाला येतात. कर्नाटक शासनाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाकारल्यास कर्नाटकच्या मंत्र्यांची वाहने कोल्हापूरात आल्यास वाहनांच्या चाकातील हवा सोडू असा इशारा संजय पवार यांनी दिला.