यत्नाळ यांच्यावर कारवाई करा!
भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडे मागणी : विविध समित्यांच्या बैठकीत दबाव
बेंगळूर : राज्य भाजपमधील गटबाजीचे राजकारण टोकाला पोहोचले असून वाद शमविण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप केला आहे. भाजपचे राष्ट्रीय मुख्य सचिव तरुण चुग, राज्य भाजप सहप्रभारी सुधाकर रेड्डी बेंगळुरात आले असून त्यांनी मंगळवारी दिवसभर पक्षाच्या कोअर कमिटीसह पक्षाच्या विविध समित्यांची बैठक घेतली. आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या बंडखोरीमुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसत असून त्यांच्यावर कारवाई करावी किंवा त्यांना लगाम घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दिल्लीला परतल्यानंतर वरिष्ठ नेते आपला अहवाल भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे सोपवतील. त्यामुळे पक्षश्रेष्ठी राज्य भाजपमधील वाद शमविण्यात कितपत यशस्वी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आल्याने पक्षश्रेष्ठींनी सोमवारीच आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. या पाठोपाठ बेंगळूरला आलेले पक्षाचे राष्ट्रीय मुख्य सचिव तरुण चुग यांनी राज्य भाजपमधील सर्व जिल्हाध्यक्ष, पक्षनिष्ठ नेते, बूथस्तरावरील नेत्यांची आणि पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक घेतली.
यावेळी सर्व नेत्यांनी यत्नाळ यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. यावेळी नेत्यांकडून चुग यांनी निवेदन स्वीकारले नाही. मी पक्षाच्या संघटनापर्व सदस्यत्व अभियानासाठी आलो आहे, तुमचे म्हणणे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यापर्यंत पोहोचवेन. 7 डिसेंबर रोजी राज्य भाजप प्रभारी राधामोहनदास बेंगळुरात येतील. तेव्हा त्यांच्याकडे निवेदन द्या, असे सांगितले. बेंगळूरच्या मल्लेश्वरम येथील भाजप कार्यालयात पक्षाच्या राज्य कोअर कमिटीची बैठक झाली. बैठकीत भाजपचे राष्ट्रीय मुख्य सचिव तरुण चुग, प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, केंद्रीय संसदीय समितीचे सदस्य व माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा, कर्नाटक भाजपचे सहप्रभारी सुधाकर रेड्डी, कर्नाटक निवडणूक निरीक्षक व राधाकृष्णन, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक, नेते सी. टी. रवी, माजी मंत्री बी. श्रीरामुलू, पुद्दूचेरीचे भाजप प्रभारी निर्मलकुमार सुराणा, माजी मुख्यमंत्री डी. व्ही. सदानंदगौडा, माजी उपमुख्यमंत्री डॉ. अश्वत्थ नारायण सहभागी झाले होते.
यत्नाळ समर्थकांसह दिल्लीत
याच दरम्यान, मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या नेतृत्त्वाला विरोध करणारे आमदार यत्नाळ व त्यांच्या गटाने दिल्लीत ठाण मांडले असून ‘कारणे दाखवा’ नोटिशीला उत्तर देण्याबरोबरच राज्य भाजपमधील घडामोडींची माहिती वरिष्ठांना देण्याची तयारी चालविली आहे. नोटिशीला उत्तर देण्यासाठी यत्नाळ स्वत: आपल्या समर्थकांसह दिल्लीत ठाण मांडून आहेत. बुधवारी सकाळी 11:30 वाजता भेटीसाठी वरिष्ठ नेत्यांनी त्यांना भेटीसाठी वेळ दिला आहे. यत्नाळ यांच्यासोबत आमदार रमेश जारकीहोळी, बी. पी. हरिश, नेते कुमार बंगारप्पा, अरविंद लिंबावळी, माजी खासदार बी. व्ही. नायक, एन. आर. संतोष आदी नेते आहेत. भाजपच्या केंद्रीय शिस्तपालन समितीसमोर आपले म्हणणे मांडण्यासाठी यत्नाळ यांनी तयारी केली आहे. नोटिशीला उत्तर देण्यासाठी 10 दिवसांची मुदत आहे. तरी सुद्धा आगामी राजकीय घडामोडींविषयी यत्नाळ यांनी मंगळवारी आपल्या समर्थक गटाशी नवी दिल्लीतील कर्नाटक भवनमध्ये चर्चा केली. नोटिशीला कोणत्या पद्धतीने उत्तर द्यावे, राज्य भाजपमधील घडामोडींपैकी कोणते मुद्दे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्यावेत, यावर चर्चा झाल्याचे समजते.
हायकमांडला लिहिलेले पत्र व्हायरल
भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा व विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्याविरोधात हायकमांडला लिहिलेले पत्र व्हायरल झाले आहे. या तिन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी अंतर्गत करार केला आहे. विरोधी पक्षनेते म्हणून आर. अशोक हे अपयशी ठरले आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, असा उल्लेख या पत्रात आहे. पक्षाच्या हितासाठी हे पत्र लिहिले असून ते कनिष्ठ स्तरावरील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लिहिले असल्याचा उल्लेख त्यात आहे. सदर पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, रा. स्व. संघ नेते मोहन भागवत, भाजपचे वरिष्ठ नेते बी. एल. संतोष यांना उद्देशून लिहिण्यात आले आहे.
वरिष्ठ नेतेच निर्णय घेतील!
आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्यावर केंद्रातील वरिष्ठ नेते लक्ष ठेवून आहेत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी की सोडून द्यावे, याविषयी वरिष्ठ नेतेच निर्णय घेतील. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रीय नेत्यांना कोणतेही निवेदन दिलेले नाही; कोणीही भीती बाळगण्याची आवश्यकता नाही.
- बी. वाय. विजयेंद्र, भाजप प्रदेशाध्यक्ष