मास्टरप्लॅनग्रस्तांचा प्रश्न कायमस्वरुपी निकालात काढा
महानगरपालिका आयुक्तांकडे केळकरबाग येथील दुकानदारांची मागणी
बेळगाव : शहरात मास्टरप्लॅन राबवताना केळकरबाग येथील दुकाने काढण्यात आली होती. त्यांना तात्पुरत्या स्वरुपात नाल्यावरती जागा देण्यात आली. परंतु, नियमानुसार नाल्यावर दुकाने थाटण्याची परवानगी नाही. त्यामुळे त्या दुकानदारांचा प्रश्न कायमस्वरुपी निकालात काढावा, अशी मागणी दुकानदारांनी महापालिका आयुक्तांकडे केली. सोमवारी महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी वॉर्ड क्र. 7 परिसरात भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. केळकरबाग येथील दुकानदारांबाबत तोडगा काढण्यासोबतच नवग्रह मंदिर येथील पाण्याची मोटर वरचेवर खराब होत असल्याची तक्रारही आयुक्तांसमोर करण्यात आली. त्याचबरोबर गटारींची स्वच्छता व कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबतही त्यांनी माहिती जाणून घेतली. महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सूचना करून वॉर्डमधील समस्या त्वरित दूर करण्याची सूचना केली. तसेच हा वॉर्ड शहराच्या बाजारपेठ परिसरात येत असल्याने प्रामुख्याने पायाभूत सुविधा राबविण्याचे आदेश दिले. यावेळी नगरसेवक शंकर पाटील यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.