फ्रिट्झला हरवून पेरीकार्ड चौथ्या फेरीत
वृत्तसंस्था/ शांघाय
येथे सुरु असलेल्या एटीपी टूरवरील शांघाय मास्टर्स पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत फ्रान्सच्या जीओव्हनी एम्पेटशी पेरीकार्डने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झचा पराभव करत एकेरीची चौथी फेरी गाठली. तसेच इटलीचा द्वितीय मानांकित जेनिक सिनरने एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात पेरीकार्डने फ्रिट्झचा 6-4, 7-5 असा पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. या सामन्यात पेरीकार्डने 12 तर फ्रिट्झने 9 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. पेरीकार्डचा एटीपी टूर स्पर्धेतील फ्रिट्झवरचा हा पहिला विजय आहे. तिसऱ्या फेरीतील हा सामना 90 मिनिटे चालला होता.
या स्पर्धेतील अन्य सामन्यात 10 व्या मानांकित होल्गेर रुनेने हंबर्टचा 6-4, 6-4, बर्जेसने सेरुनडोलोचा 7-6 (7-1), 6-3, 31 व्या मानांकित डायलोने गोफिनचा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. या लढतीत पहिल्या सेटनंतर गोफिनने दुखापतीमुळे माघार घेतली. दुसऱ्या फेरीतील सामन्यात इटलीच्या द्वितीय मानांकित सिनरने डॅनियल अल्टमेयरचा 6-3, 6-3 असा फडशा पाडत पुढील फेरीत स्थान मिळविले. सिनरला या सामन्यात विजयासाठी चांगलेच झगडावे लागले.