बेळगाव तालुक्यात आता बारमाही रताळी पीक
शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी देणारे पीक : मान्सूनपूर्व पावसामुळे काढणी खोळंबली
वार्ताहर/किणये
बेळगाव तालुक्यातील रताळी पिकाला अलिकडे मागणी वाढली आहे. या भागातील लाल मातीतील रताळी ही खाण्यासाठी रुचकर व स्वादिष्ट असतात. यापूर्वी तालुक्यात केवळ खरीप हंगामात रताळी पिकाचे उत्पादन घेण्यात येत होते. अलिकडे मात्र काही वर्षापासून उन्हाळ्यातही रताळी लागवड करण्यात येऊ लागली आहे. त्यामुळे आता बारा महिने रताळी पिकाचे उत्पादन घेण्यात येत आहे. या पिकाच्या लागवडीसाठी खर्च कमी येतो. त्यामुळेच शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी देणारे पीक म्हणून ओळखले जात आहे. सध्या उन्हाळ्यातील रताळी पिकाची काढणी सुरू करण्यात आली होती. या कालावधीतच मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाला असल्याने रताळी काढणी खोळंबली आहे.
रताळी पिकाच्या वेलीपासूनच बियांसाठी लागवड केली जाते व ही वेल वाढल्यानंतर पुन्हा त्याची लागवड करण्यात येते. अशी ही प्रक्रिया असल्यामुळे बियाणासाठी खर्च कमी येतो. त्यामुळे या पिकाच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला पहावयास मिळत आहे. माळरानावरील शिवारात बांध (मेरा) तयार करून त्यावर दोन आळीने रताळी वेलीची लागवड करण्यात येत आहे. तसेच उन्हाळी हंगामात छोटे छोटे बांध तयार करून, त्यावर दोन आळीप्रमाणे रताळी वेलीची लागवड केलेली आहे. उन्हाळी लागवड केलेल्या पिकासाठी विहिरी व कूपनलिकेचे पाणी शेतकऱ्यांनी दिले आहे. उन्हाळी रताळी पिकासाठी बहुतांशी प्रमाणात ठिबक सिंचन व स्प्रिंकलरद्वारे पाणी दिले आहे. यामुळे पाण्याची बचतही झाली आहे. तसेच ज्या शिवारांमधील विहिरी व कूपनलिकांना कमी प्रमाणात पाणी आहे. अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा उपयोग करून रताळी लागवड केली आहे.
पश्चिम भागात उन्हाळी रताळी लागवड
तालुक्याच्या पश्चिम भागातील बेळगुंदी, सोनोली, यळैबैल, कावळेवाडी, बिजगर्णी, बोकनुर, बेळवट्टी, इनाम बडस, बाकनुर, झाडशहापूर, वाघवडे, बामणवाडी, किणये, बहाद्दरवाडी, बाळगमट्टी, जानेवाडी या भागात उन्हाळी रताळी लागवड केलेली आहे. उन्हाळ्यातील रताळी काढण्यासाठी सज्ज झाली आहेत. याची काढणी सुरू होती. मात्र सध्या पावसाची उघडीप महत्त्वाची आहे.
रताळीला दरही बऱ्यापैकी
खानापूर तालुक्याच्या काही परिसरात तसेच चंदगड भागात रताळी पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. बेळगाव एपीएमसीमधून दिल्ली, मुंबई, बेंगळूर, हरियाणा, अमेरिका आदी ठिकाणी निर्यात केली जाते. रताळी पिकाचा उपयोग फुड इंडस्ट्रीमध्ये अधिक प्रमाणात करण्यात येतो. यापूर्वी उन्हाळ्यातील काढणीमधील मार्केट यार्डमध्ये शनिवार व बुधवारच्या बाजारात800 ते 1000 पोती रताळी विक्रीसाठी येत होती. सध्या पावसामुळे घट झाली आहे.शनिवारी बाजारात केवळ 70 ते 80 इतकीच पोती रताळी आली होती. यामुळे 2000 ते 2400 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
- अशोक गावडा, बेळगुंदी