For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आत्मस्वरूपाचा विसर पडलेले लोक कर्म करूनही दु:खी होतात

06:30 AM Nov 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
आत्मस्वरूपाचा विसर पडलेले लोक कर्म करूनही दु खी होतात
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

योगी कोणत्याही प्रकारच्या कर्मफलाची अपेक्षा न ठेवता कर्म करत असल्याने त्या कर्माच्या पूर्ण होण्यानं वा न होण्यानं होणाऱ्या सुखदु:खाबाबत तो उदासीन असतो. योग्याला फक्त लोककल्याण साधायचे असते. त्याला सर्व सजीवनिर्जीव एकाच ईश्वराची रूपे वाटत असल्याने त्याला ते सर्व त्याचे कुटुंबीय वाटत असतात. सर्वांच्यावर त्याचे सारखेच प्रेम असते. हे विश्वची माझे घर असा त्याचा ठाम विचार असतो. स्वत:च्या घरातले लोक सुखी व्हावेत म्हणून तो झटत असतो. माउलींनी पसायदानात जो जे वांछील ते तो लाहो अशी योग्याची मन:स्थिती असल्याचे स्वानुभवातून म्हंटलेच आहे. ही सर्व पूर्ण चित्तशुद्धी झाल्याची लक्षणं आहेत आणि योग्याचा निरपेक्षतेनं कर्म करण्यात पूर्ण चित्तशुद्धी व्हावी व परमेश्वराशी जवळीक साधली जावी हाच हेतू असतो. विकार नष्ट होऊन सत्य, क्षमा, दया, सरलता आणि संतोष हे सद्गुण अंगी मुरले की, मनुष्याचे चित्त शुद्ध होते. त्याच्याशी कुणी कसंही वागलं तरी तो त्यानुसार न बदलता वरील सद्गुणांनी युक्त असंच वागतो. निरपेक्षतेनं जे कर्म करतात त्यांची चित्तशुद्धी होत असल्याने त्यांचा स्वभाव असा तयार होत असतो.

सध्या आपण अभ्यासत असलेल्या कायिकं वाचिकं बौद्धमैन्द्रियं मानसं तथा । त्यक्त्वाशां कर्म कुर्वन्ति योगज्ञाश्चित्तशुद्धये ।।10।। ह्या श्लोकात बाप्पांनी सांगितल्याप्रमाणे, कायिक, वाचिक, बुद्धिविषयक, इंद्रियविषयक व मानसिक कर्मफलाची आशा सोडून योगज्ञानी चित्तशुद्धीकरिता कर्म करतात. त्यांचे सर्व विचार, सर्व हालचाली या केवळ निरपेक्षतेनं कर्म करण्यासाठी असतात आणि हे केवळ वर सांगितलेल्या स्वभावानुसार वागण्यानं शक्य होतं. जो याप्रमाणे वागत नाहीत त्याच्या पदरी दु:ख येतं असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.

Advertisement

योगहीनो नरऽ कर्म फलेहया करोत्यलम् ।

बध्यते कर्मबीजैऽ स ततो दु:खं समश्नुते ।। 11 ।।

अर्थ-योगज्ञानहीन मनुष्य फलाच्या इच्छेने पुष्कळ कर्म करतो. तो फलेच्छेने बद्ध होतो व त्यापासून दु:ख पावतो.

विवरण- केवळ चित्तशुद्धी व्हावी म्हणून कर्मयोगी कर्म करतात. जसजशी निरपेक्ष कर्म त्यांच्या हातून होऊ लागतात तसतसे त्यांचे चित्त शुद्ध होत जाते. कुणाकडून कसलीही अपेक्षा नसल्याने तसेच काही मिळवावे ह्या आशेने कोणतेही कर्म करत नसल्याने त्यांच्यातील राग, द्वेष, सुख, दु:ख इत्यादि सामान्य माणसात आढळणारे विकार नाहीसे होतात आणि सत्य, क्षमा, दया, सरलता, संतोष हे सद्गुण त्यांच्या स्वभावात सहजी दिसून येतात. शुद्ध झालेल्या चित्तामुळे आणि अंगी प्रकटलेल्या सद्गुणांमुळे सर्वांचे भले व्हावे ह्या हेतूने त्यांच्या हातून अधिकाधिक लोककल्याणकारी कार्ये सहजी होऊ लागतात. याउलट कर्मयोग न आचरणारे आणि स्वत:च्या मूळ स्वरूपाचे ज्ञान नसलेले लोक स्वत:ला कर्ता समजतात आणि मनात काही अपेक्षा ठेऊन कर्मे करतात त्यांना कधीच समाधान मिळत नाही कारण अपेक्षा पूर्ण झाली तर आणखीन अपेक्षेनं पुढील कार्याला लागतात. जर झाली नाही तर अपेक्षाभंगाचे दु:ख त्यांच्या पदरी पडते. कर्मयोगी सुखी का असतो त्याचं रहस्य बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत

मनसा सकलं कर्म त्यक्त्वा योगी सुखं वसेत् ।

न कुर्वन्कारयन्वापि नन्दश्वभ्रे सुपत्तने ।।12।।

अर्थ-योगी मनाने सर्व कर्मांचा त्याग करून काही न करता अथवा काही न करविता गुहेमध्ये अथवा मोठ्या नगरामध्ये आनंदयुक्त होत सुखाने राहतो. विवरण-कर्मयोगी स्वत:ला कर्ता मानत नसल्याने तो करत असलेली लोककल्याणकारी कामे ईश्वर त्याच्याकडून करून घेत आहेत अशी त्याची पुरेपुर खात्री असते. त्यासाठी आवश्यक त्या शारीरिक हालचालीही तेच घडवून आणत आहेत असे तो समजत असतो.

Advertisement
Tags :

.