लोकांनी सण साजरे करण्यावर लक्ष द्यावे
बलात्कार-हत्येमुळे जनक्षोभ असताना ममता बॅनर्जींच्या आवाहनामुळे संतापात आणखी भर
वृत्तसंस्था/ कोलकाता
कोलकात्यातील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात 9 ऑगस्टला घडलेल्या भीषण बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे पश्चिम बंगालमध्ये वातावरण प्रचंड तापले असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पेलेल्या वादग्रस्त विधानामुळे लोकांच्या संतापात आणखी भर पडली आहे. आता झाले गेले विसरुन लोकांनी सणवार साजरे करण्यावर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या विधानावर चहूबाजूंनी टीकेचा वर्षाव होत आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था स्थिती रसातळाला गेली असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सण साजरे करण्याची भाषा बोलत आहेत. गंभीर प्रश्नावरुन लोकांचे लक्ष दुसरीकडे हटविण्याचा त्यांचा हा डाव आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पीडित महिला डॉक्टरच्या मातेनेही या आवाहनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
जखमेवर बॅनर्जींनी चोळले मीठ
आमच्या डॉक्टर कन्येच्या शोकांतिकेनंतर आता आम्ही सण साजरा करण्याची कल्पनाही करु शकत नाही. आजवर आम्ही आमच्या कन्येसह दुर्गापूजा उत्सव साजरा केला होता. पण यापुढे आमच्या घरात आता दुर्गापूजा किंवा कोणताही सण कधीही साजरा होऊ शकणार नाही. ममता बॅनर्जी यांच्या सण साजरे करण्याच्या आवाहनावरुन त्यांना घडलेल्या प्रसंगाचे कोणतेही गांभीर्य नाही, हेच स्पष्ट होत आहे. आमच्या भावना त्यांना कळत नाहीत. त्यांनी आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, अशी टीका या मातेने केली आहे.
सुरक्षा व्यवस्थेचा आढावा
कोलकाता प्रकरणावरुन राज्यात आजही आंदोलन केले जात आहे. अशा स्थितीत दुर्गापूजा आणि नवरात्रीचा सण जवळ आला आहे. नवरात्रीचा सण पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने प्रशासकीय तयारीचा आढावा घेण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर त्यांनी लोकांना शांत राहण्याचे आणि आता सण साजरा करण्यासाठी तयारीला लागण्याचे आवाहन केले होते.
भाजपचे बॅनर्जींवर शरसंधान
राज्यात घडलेल्या भयानक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे राज्यातील कोट्यावधी लोक दु:खात बुडालेले असताना आणि रस्त्यांवर उतरुन आंदोलन करीत असताना, मुख्यमंत्री बॅनर्जी त्यांना सण साजरे करण्याचे आवाहन करीत आहेत. पीडितेला अद्याप न्याय मिळालेला नाही. मात्र, ममता बॅनर्जींना सण सुचत आहेत, यावरुन त्यांची मानसिकता कोणत्या थराला गेली आहे, हे समजून येते. राज्यातील अनेक दुर्गापूजा मंडळांनी राज्य सरकारकडून मिळणारे मानधन यावेळी नाकारले आहे. यावरुन लोकांच्या भावना या घटनेमुळे किती तीव्र आहेत, याची कल्पना येते. तथापि, बॅनर्जी असंवेदनशील असून त्यांना जनतेच्या भावनांची चाड उरलेली नाही. त्यांना हीच जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात भारतीय जनता पक्षाचे आयटी विभाग प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे.
आंदोलन मागे घेण्यास नकार
सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला असूनही कामावर येण्यास पश्चिम बंगाल कनिष्ठ डॉक्टर्स संघटनेने नकार दिला आहे. कामावर येण्यासाठी त्यानी पाच अटी ठेवल्या आहेत. ममता बॅनर्जी सरकारने सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल चालविली असल्याचा आरोप त्यांनी केला. डॉक्टरांच्या संपामुळे 23 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वक्तव्य राज्य सरकारचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केले होते. ते खोटे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोणत्याही रुग्णालयात सेवा पूर्णपणे थांबविण्यात आलेली नाही. सर्व तातडीच्या वैद्यकीय सेवा पुरविल्या जात आहेत. आंदोलनाच्या काळात रुग्णालयात झालेल्या मृत्यूंना हे डॉक्टर्स उत्तरदायी आहेत, असे भासवून बॅनर्जी सरकार आंदोलकांना बदनाम करु पहात आहे, असे प्रतिपादन डॉक्टरांच्या संघटनेने केले. 10 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कामावर उपस्थित राहावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांना दिला होता.