सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील PG डॉक्टर शिकावू नसून, MBBS झालेले
जनतेने ते शिकाऊ डॉक्टर असल्याचा गैरसमज दूर करावा ; वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे
ओटवणे | प्रतिनिधी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नव्याने दाखल झालेल्या आठ पीजी डॉक्टरांच्या टीम मधील डॉक्टर शिकावू नसून ते एमडी, एमएस उच्च वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. त्यामुळे जनतेने ते शिकाऊ डॉक्टर असल्याचा गैरसमज दूर करावा. कारण सहा महिन्यानंतर परिक्षा झाल्यावर तेच तज्ञ डॉक्टर म्हणुन आपल्याकडे पुर्णवेळ सेवेत रुजू होतील. पर्यायाने जनतेने त्यांना सहकार्य करावे. असे आवाहन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांनी केले आहे.
याबाबत माहिती देताना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे म्हणाले, कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातुन शिक्षण घेऊन आलेले एकूण आठ पीजी डॉक्टर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सेवा देत आहेत. यामध्ये डॉ. आयुष सेठी (एमएस ऑर्थो), डॉ. चिन्मय डाकलिया (एमडी मेडिसिन), डॉ. वैभव बिसने (एमडी मेडिसिन), डॉ. अमशुला कोचेरू (एमएस जनरल सर्जरी), डॉ. श्रद्धा वोहरा (एमएस ओब - गायन ),डॉ. गायत्री कुप्पुसामी (एमडी रेडिओडायग्नोसिस), डॉ. विधी मोदी (एमडी पॅथॉलॉजी), डॉ. योगेश्वरी (एमडी ऍनेस्थेसियोलॉजी) यांचा समावेश आहे. रूग्णसेवेसाठी ते सध्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. हे सर्व डॉक्टर शिकाऊ नसून एमबीबीएस होऊन दोन-दोन वर्षे सेवा दिलेले डॉक्टर आहेत.तसेच महाराष्ट्रातील केईम, जेजे मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, सीपीआर हॉस्पिटल, मिरज मेडीकल कॉलेज आदी अनेक मोठी हॉस्पिटल तसेच गोवा मेडिकल कॉलेज ही सर्व हॉस्पिटल अशा प्रकारच्या पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या सेवेवरच चालतात. त्यामुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील हे डॉक्टर शिकाऊ आहेत हा गैरसमज जनतेने मनातून काढून टाकावा. त्यात सावंतवाडीची आदरातिथ्याची संस्कृती आहे. त्यामुळे शिकावू डॉक्टर अशी त्यांची अवहेलना होऊ नये याची प्रत्येकाने काळजी घेऊन त्यांना सहकार्य करावे. तसेच उपजिल्हा रुग्णालयात जनतेला चांगली सेवा देण्यासाठी आम्ही काम करू अशी ग्वाही सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यानी दिली.