शतकांपासून गुहेत राहणारे लोक
गुहेत मुलांसाठी मोठे मैदान
पृथ्वीवर पाताळलोक कुठे आहे हे कुणीच जाणत नाही, परंतु स्वर्ग आकाशात तर पाताळलोक जमिनीखाली वसलेले असल्याचे मानले जाते. पृथ्वीवर एक पर्वतीय गुहेत 100 हून अधिक लोक राहतात. जीवन जगण्यासाठी या लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तेथे मूलभूत सुविधांचा अभाव आहे, परंतु सोशल मीडियावर या गावाची छायाचित्रे व्हायरल होत असून ती पाहून तुम्ही थक्क व्हाल.
या दुर्गम गावातील लोकांना बाजारासाठी 15 किलोमीटरची पायपीट करावी लागते. परंतु येथे मुलांना शिकण्यासाठी जागा आणि बास्केटबॉलचे मैदान देखील आहे. पाताळलोकसारखे गाव चीनच्या गुइझोउ प्रांतात असून त्याचे नाव झोंगडोग आहे. या गावातील लोक शतकांपासून याच गुहेत राहत आले आहेत. ही गुहा समुद्रसपाटीपासून 1800 मीटरच्या उंचीवर आहे.
2008 मध्ये येथील शाळा चिनी सरकारने बंद केली होती. गुहेत राहणे चिनी संस्कृतीचा हिस्सा नसल्याचे कारण याकरता देण्यात आले होते. अशा स्थितीत आता ही मुले गावातील दुसऱ्या शाळेत जातात आणि दररोज सकाळ-संध्याकाळ दोन तास अभ्यास करतात. प्रारंभी या गावाकरता रस्ते नव्हते तसेच मनोरंजनाची कुठलीच साधने नव्हती. परंतु प्रसारमाध्यमांमध्ये या गावाची चर्चा होऊ लागताच सरकारने येथील विकासावर लक्ष दिले आहे.
एकीकडे पर्यटकांची संख्या वाढत गेली तर दुसरीकडे बाहेरील जगाशी जोडण्यासाठी या गावात रस्त्याची निर्मिती करण्यात आली. आता अनेक लोकांनी हे गाव सोडले आहे, परंतु अनेक जण अद्याप तेथेच राहत आहेत. तर उच्च शिक्षणासाठी येथून बाहेर गेलेली मुले दर आठवड्याला स्वत:च्या गावात येतात आणि कुटुंबीयांची भेट घेत असतात.