येथे पिंजऱ्यात राहतात लोक
आत मिळतो केवळ एक बेड
हाँगकाँग शहर जगात अब्जाधीशांसाठी स्वर्ग मानला जातो. परंतु या झगमगाटामागे काळे सत्य आहे. या शहरात प्राणी नव्हे तर माणूस पिंजऱ्यात कैद आहेत. त्यांना ‘केज होम्स’ किंवा ‘बेडस्पेस अपार्टमेंट्स’ म्हटले जाते, ज्यात लोखंडी जाळ्यांनी वेढलेला एक छोटा बेड असतो. जेथे केवळ झोपणे शक्य असून जीवन जगणे नाही.
हाँगकाँगमधील सुमारे 2.2 लाख लोकांचे आयुष्य अशाच पिंजऱ्यांमध्ये सुरु असून यात प्रामुख्याने वृद्ध, नवे स्थलांतरित, कमी उत्पन्न असलेले कामगार आणि मुले सामील आहेत. या पिंजऱ्यांमध्ये केवळ एक बेड दिला जातो आणि याच्या बदल्यात जवळपास 16000 ते 50000 रुपयांचे भाडे भरावे लागते.
तुरुंगापेक्षाही बिकट
माणसांचे हे घर तुरुंगापेक्षाही बिकट आहे. 50 हजार भाडे भरूनही केवळ 16 चौरस फूट क्षेत्र मिळते. त्यातही कुठल्याही प्रकारचे खासगीत्व नसते. खेळती हवा, प्रकाशाशिवाय तेथे लोकांना रहावे लागते. केज होम्सची कहाणी 1950-60 च्या दशकापासून सुरु झाली होती. हाँगकाँगमध्ये चिनी स्थलांतरित कामगारांचा जणू पूरच आला होता. सरकार सार्वजनिक निवासव्यवस्था निर्माण करू न शकल्याने जुन्या इमारतींना विभागून छोटे छोटे ‘कॉफिन क्यूबिकल्स किंवा ‘केज’ तयार करण्यात आले. हे अपार्टमेंट्स शम शुई पो, मंग कोक, ताई कोक त्सुई यासारख्या जुन्या भागांमध्ये आहेत. एका खोलीत 20-30 केज लावलेले असतात, वर-खाली स्टॅक्ड असतात, आत केवळ एक डबल बंक बेड असतो, ज्याच्या चहुबाजूला लोखंडी जाळी असते. यात किचन तसेच बाथरुम नसते. यात शेयर्ड टॉयलेट असतात, ज्यात 4 फॅमिलीसाठी एक टॉयलेट असतो. व्हेंटिलेशनशिवाय येथे राहणे अत्यंत त्रासदायक असते.