चित्रपटातील लोकांनी घर समजून गोव्यात यावे
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन : 56 व्या ‘इफ्फी’ महोत्सवाची शानदानर सांगता,‘स्कीन ऑफ युथ’ गोल्डन पिकॉकचा मानकरी,‘माय डॉटर्स हेयर’ व ‘फ्रँक’ यांना सिल्वर पिकॉक,सुपरस्टार रजनीकात ‘जीवन गौरव’ने सन्मानित
पणजी : गोवा राज्य हे ‘फिल्म हब’ करण्याचा इरादा असून चित्रपट क्षेत्रातील सर्वांनी आपलेच घर असल्याचे समजून गोव्यात यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात केले. यावेळी 50 वर्षे चित्रपटात काम केलेला 75 वर्षीय सुपरस्टार रजनीकांत यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. महोत्सवातील सुवर्ण मयूर (गोल्डन पिकॉक) हा प्रतिष्ठीत किताब ‘स्कीन ऑफ युथ’ या चित्रपटास देण्यात आला तर चंदेरी मयूर (सिल्व्हर पिकॉक) ‘माय डॉटर्स हेयर’ आणि ‘फ्रँक’ या दोन्ही चित्रपटांना विभागून देण्यात आला. बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सटेडियमवर हा दिमाखदार रंगीबेरंगी रोषणाईने सोहळा रंगला. त्यासाठी लोकांची मोठी गर्दी दिसून आली. अभिनेता रणबीरसिंग याची व्यासपीठावरील ‘एंट्री’ शानदार ठरली. ‘सेफ हाऊस’ या चित्रपटास युनोस्कोचे गांधी पदक प्रदान करण्यात आले. गेले नऊ दिवस गोव्यात चालू असलेल्या या महोत्सवाची या समारोप सोहळ्याने सांगता झाली.
डॉ. सावंत पुढे म्हणाले की, गोव्यातील आंतरराष्ट्रीय महोत्सवाने जागतिक उंची गाठली असून त्यातून नवीन निर्माते, दिग्दर्शक, कलाकार तयार होत आहोत आणि पुढे येत आहेत. जनता-समाजासाठी चित्रपटाचे माध्यम मोठे प्रभावी असून त्यातून जनजागृती साधता येत असल्यामुळे जनतेला समाजाला नवी दिशा दाखवता येते, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले. महोत्सवात बक्षिसे मिळवलेल्या चित्रपटांचे आणि त्यातील कलाकार व इतर मानकरी यांचे त्यांनी अभिनंदन केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अभिनंदनाचा संदेशही सांगितला. मोदी यांच्या कार्यक्रमामुळे यायला थोडा उशीर झाल्याचे सावंत यांनी सांगितले.
मुरुगन यांच्याकडून गोव्याची स्तुती
केंद्रीय प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी गोव्यातील या महोत्सवाची तोंड भरून स्तुती केली. चित्ररथ मिरवणुकीने महोत्सवाची सुरुवात चांगली वाटली. त्याशिवाय गुरुदत्त, के. वैकुंठ, सलील चौधरी यांची शताब्दी साजरी करण्यात आली. फिल्म बाजारातून रु. 1000 कोटीपेक्षा अधिक रकमेची उलाढाल झाली. तसेच या महोत्सवातून नारीशक्तीचा प्रत्यय आला. एकूण 50 महिला दिग्दर्शक-निर्मात्या असलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन महोत्सवातून झाल्याचे मुरुगन म्हणाले. अनेक नवीन सुरुवात या महोत्सवातून दिसून आल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.
पुनर्जन्म मिळाला तर अभिनेताच म्हणून येईन : रजनीकांत
सुपरस्टार रजनीकांतचे व्यासपीठावर आगमन होताच श्रोत्यांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. त्यांना डॉ. सावंत आणि डॉ. मुरुगन यांच्या हजेरीत जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. आपण सिनेमावर खूप प्रेम केले आणि अजूनही करतो. पुन्हा जन्म मिळाला तर अभिनेता म्हणूनच जन्माला येईल, असे भाष्य रजनीकांत यांनी केले आणि पुरस्कार दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
महोत्सवाच्या समारोपाची सुरुवात दिव्यांगांच्या गणेशवंदनाने झाली. ‘एकदंताय वक्रतुंडाय’ हे गीत त्यांनी समर्थपणे सादर करून श्रोत्यांच्या जोरदार टाळ्या मिळवल्या. कर्नाटकातील ‘यक्षगान’ या कार्यक्रमाची झलक सादर करण्यात आली. तसेच सेव्हन सिस्टर्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या उत्तर-पूर्व भारतातील राज्यांचे विविध लोकनृत्य प्रकार सादर झाले. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. महोत्सवातील अनेक नवीन गोष्टींची त्यांनी थोडक्यता माहिती दिली. जय भानुशाली आणि टिस्का चोप्रा या जोडीने समारोप सोहळ्याचे सुरेख सूत्रनिवेदन केले.