नंदगड बाजारपेठेतील रहदारीच्या कोंडीमुळे जनता त्रस्त
बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांनी रस्त्यावरच दुकाने थाटल्याने समस्या : पार्किंग व्यवस्थेचा बोजवारा
वार्ताहर/नंदगड
नंदगड येथील बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने रस्त्यावर थाटली आहेत. तर दिवाळीचा सण असल्याने नंदगड व परिसरातील लोकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे नंदगड बाजारपेठेत मंगळवारी वारंवार रहदारीची कोंडी होत आहे. नंदगड हे परिसरातील 40 ते 50 गावांचे केंद्रस्थान आहे. येथे बुधवारी आठवडी बाजार भरतो. तर सोमवारी बँक व अन्य कामांसाठी लोकांची मोठी वर्दळ असते. अन्य दिवशी मात्र मोजकेच लोक बाजारात दिसतात. त्या दिवशी खरेदीदारांअभावी मात्र व्यापाऱ्यांवर मोठा परिणाम दिसून येतो. नंदगड येथील दुकानदारांनी आपल्या दुकानांच्या समोर असलेल्या गटारी ओलांडून रस्त्यावरच दुकाने थाटली होती. बाजारपेठेतील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी वारंवार होत होती. ग्रा.पं.तर्फे लक्ष्मीयात्रेपूर्वी आठवडाभर बाजारपेठेतील अतिक्रमण जेसीबीद्वारे हटवली होती. त्यामुळे बाजारपेठेत यात्रेदरम्यान कोणतीही रहदारीची अडचण झाली नव्हती.
यात्रा संपताच रस्त्यावर अतिक्रमण
लक्ष्मीयात्रा संपताच लागलीच महिन्याभरात काही दुकानदारांनी पुन्हा अतिक्रमण केले आहे. तर काहीजण गटारी ओलांडून रस्त्यावरच दुकाने थाटत आहेत. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या लोकांना मोठी अडचण होत आहे. बाजूने जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना अडचण येत आहे. परिणामी रहदारीची कोंडी होत आहे. पार्किंग व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. दिवाळी सणादरम्यान याचा प्रत्यक्ष अनुभव दिसून आला.