उन्हाच्या झळांमुळे जनता हैराण
हवामान खात्याच्या अंदाजानुसार बेळगावसह बागलकोट, धारवाड, गदग, हावेरी, कोप्पळ शहरांना उष्णतेचा तडाखा
बेळगाव : राज्यात 5 मेपर्यंत उष्णतेची लाट तीव्र होणार आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उन्हाच्या झळांमुळे सर्व जनता हैराण झाली असून आरोग्य खात्याने दिलेल्या सूचनेनुसार तातडीच्या कामाव्यतिरिक्त शक्यतो दुपारी 12 ते 3 यावेळेत बऱ्याच लोकांनी घरी राहणेच पसंत केले. तथापि, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार करण्यासाठी उमेदवार आणि कार्यकर्ते उन्हाची तमा न बाळगता बाहेर पडत आहेत. तसेच लग्नसराईचे मुहूर्त संपत आल्याने लग्नासाठीची वर्दळही बऱ्याच प्रमाणात दिसून आली. मात्र, एकूणच उन्हाचा ताप असह्या झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दि. 1 मे रोजी बेळगावसह बागलकोट, धारवाड, गदग, हावेरी, कोप्पळ या शहरांना उष्णतेचा तडाखा जाणवला. दि. 2 रोजीसुद्धा बेळगावला उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. दि. 5 पर्यंत बेळगाव, धारवाड, गदग, हावेरी यासह अन्य शहरांना उष्णतेच्या लाटेचा फटका सहन करावा लागणार आहे. उन्हाचा तडाखा केवळ मानवी समूहालाच बसतो आहे असे नाही. तर जनावरांनाही तो बसतो आहे. मोकाट गायी, कुत्री आणि अन्य जनावरे सावलीखाली निवारा घेत आहेत. तर ज्यांच्याकडे गायी-म्हशी आहेत, त्यांनी या प्राणीमात्रांचा विचार करून गोठ्यातही पंखे लावले आहेत. यंदा प्रथमच गोठ्यामध्ये पंखे लावण्याची वेळ आलेली आहे.
जनावरांसाठी मुक्त गोठ्याची उभारणी
जनावरांना बोलता येत नाही, परंतु उन्हाचा तडाखा असह्या झाल्याने त्यांची तगमग सुरू होते. बऱ्याच ठिकाणी गोठ्यांवर पत्र्यांचे शेड आहे. त्यामुळे पत्रा तापल्याने जनावरांची आणखी तगमग होऊ लागते. या जनावरांचा विचार करून मालकांनी गोठ्यामध्येसुद्धा पंखे बसवले आहेत. आजपर्यंत उष्णतेचा तडाखा जाणवत होता तरी तो इतका तीव्र नव्हता. परंतु, यंदा तीव्रता वाढल्याने मुक्या प्राण्यांचा विचार करून आपण पंखे बसविल्याचे कुरुंदवाड येथील दत्तात्रय हुद्दार-इनामदार यांनी सांगितले. याशिवाय काही गावांमध्ये मुक्त गोठासुद्धा उभारला आहे. म्हणजेच ज्या जनावरांसाठी स्वतंत्र असा गोठा नाही किंवा जी भटकी जनावरे आहेत, त्यांनासुद्धा निवारा मिळावा या हेतूने मुक्त गोठा उभारला आहे.
शहाळी उत्पादनांवर परिणाम...
दरम्यान, उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या, ताक, सरबत, शहाळ्याचे पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र, गतवर्षी आणि एकूणच पावसाचे प्रमाण समाधानकारक नसल्याने शहाळी उत्पादनांवर परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत शहाळ्यांची आवक मंदावली आहे. लहान आकारातील शहाळ्याची किंमत 20 तर मोठ्या आकाराच्या शहाळ्याची किंमत 40 रुपये अशी होती. लोक पैसे देऊन शहाळी खरेदी करण्यास तयार आहेत. परंतु, शहाळीच उपलब्ध नाहीत. रुग्णांसाठी शहाळी आवश्यक असली तरीसुद्धा आवक नसल्याने त्यांनासुद्धा शहाळी मिळणे दुरापास्त झाले आहे.