मोदींकडून जनतेची दिशाभूल
मुंदगोड येथील प्रजाध्वनी मेळाव्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची टीका
कारवार : खोटेपणा भाजपचे देवघर आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेची दिशाभूल करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. शुक्रवारी कारवार जिल्ह्यातील मुंदगोड येथे आयोजित केलेल्या प्रजाध्वनी मेळाव्याला चालना देऊन बोलताना ते पुढे म्हणाले, युवकांनी मोदी यांच्याकडे रोजगाराची मागणी केली असता पकोड्यांची विक्री करा, असे बेजबाबदारीचे वक्तव्य पंतप्रधानांनी केले होते. नरेंद्र मोदी यांना गेल्या दहा वर्षांत बेरोजगारी समस्येवर तोडगा काढता आला नाही. मोदी मोठ्या आवेशाने आणि जोशपूर्ण भाषणे करतात. मोदी यांनी खोटे सांगून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. जात-धर्माच्या नावाने द्वेष पसरवून राजकारण करीत आहेत. हे जनतेने आता जाणून घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो म्हटले. मात्र त्याऐवजी वस्तूंचे दर वाढविले.
गॅरंटी योजनांमध्ये अडथळा आणण्याचा केंद्राचा प्रयत्न
गरीब उपाशीपोटी झोपू नयेत, कर्नाटक भूकमुक्त करावे म्हणून अन्नभाग्य योजनेतून आम्ही तांदळाचे वितरण केले. बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखालील सरकार आले तेव्हा तांदूळ वितरणात कपात केली. काँग्रेस सरकार सत्तारूढ होताच मंत्रिमंडळाची बैठक घेऊन पाच गॅरंटी योजनांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. आम्ही हे करीत असताना आमच्या गॅरंटी योजनांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला. तथापि आम्ही हार मानली नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढे म्हणाले, 7 मे रोजी होणाऱ्या मतदानावेळी काँग्रेस उमेदवाराला आशीर्वाद द्या. मतदारांचा लोकसभेत आवाज उठविण्यासाठी काँग्रेसला संधी द्या. कारवार जिल्ह्यातील नागरिक राजकीयदृष्ट्या सुज्ञ आहेत, बुद्धिवंत आहेत. देशातील राजकारणाचे विश्लेषण करण्याची क्षमता कारवार जिल्हावासीय बाळगून आहेत. दिलेला शब्द पाळणारे येथील मतदार आहेत. बोले तैसा चाले, शब्द कृतीत आणणाऱ्या काँग्रेसला मतदान करा, संविधानाच्या रक्षणासाठी आणि लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसला मतदान करा, असे आवाहन सिद्धरामय्या यांनी केले.
अतिक्रमणदारांच्या बाबतीतही भाजपचे राजकारण
याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची सवय भाजपवाल्यांना जडली आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीतही भाजपवाले राजकारण करीत आहेत. उत्पन्न दुप्पट करतो असे सांगून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. अतिक्रमणदारांच्या बाबतीतही राजकारण करण्यात येत आहे. काँग्रेस केंद्रात सत्तेत येताच अतिक्रमणदारांची समस्या मार्गी लावण्यात येईल. याबाबतीत कुणीही भीती बाळगण्याची गरज नाही. गेली अनेक वर्षे अतिक्रमण समस्या सोडविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या वकील रविंद्र नाईक यांनाही योग्य ते स्थानमान देण्यात येईल, असे सांगून डी. के. शिवकुमार पुढे म्हणाले, राज्यात दुष्काळाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. तरीही दुष्काळावर मात करण्यासाठी निधी मंजूर करताना केंद्र सरकार भेदभाव करीत आहे. केंद्र सरकार अस्तित्व हरवून बसले आहे. कोरोना महामारीच्या काळातही केंद्र सरकारने राज्य सरकारला मदत केली नाही. काँग्रेसकडून काय मंदिरे उभारली गेली नाहीत का? आम्ही पण हिंदूच, तथापि आम्ही भाजपसारखे हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करीत नाही. बंगारप्पा मुख्यमंत्री असताना शेकडो मंदिरे बांधण्यात आली. धर्माच्या, हिंदुत्वाच्या नावाने राजकारण करण्याचा हक्क भाजपला नाही, असे पुढे शिवकुमार यांनी सांगितले.
अंजली निंबाळकरांना विजयी करून ठप्प झालेले विकासाचे दालन खुले करा
याप्रसंगी बोलताना हल्याळचे आमदार आर. व्ही. देशपांडे म्हणाले, केंद्रातील भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे देश 25 वर्षे पाठीमागे ढकलला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, महिलांसाठी काय केले? असा प्रश्न उपस्थित करून देशपांडे पुढे म्हणाले, देशातील रोजगारात वाढ झाली आहे? तथापि याचे उत्तर मोदी यांच्याकडे नाही. विकास ठप्प झाला आहे. गरिबांनी शेकडो रुपये भरून जनधन खाते उघडले. तथापि याचा काही एक लाभ झाला नाही. मोदी यांना वक्तृत्व कला अवगत असली तरी ते गरिबांच्या पाठीशी नाहीत. याप्रसंगी बोलताना कारवार जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य म्हणाले, विकासाचा ध्यास घेतलेल्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. निंबाळकर यांना विजयी करा आणि गेल्या अनेक वर्षांपासून ठप्प झालेले विकासाचे दालन खुले करा, असे आवाहन केले.