संध्या सुरक्षा पेन्शन योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांची पेन्शन बंद
पेन्शन बंद पडलेल्यांची तहसीलदार कार्यालयात गर्दी : तीन महिन्यांपासून अपात्र लाभार्थ्यांचा शोध
बेळगाव : संध्या सुरक्षा पेन्शन योजनेंतर्गत दरमहा पेन्शन घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. एपीएल रेशनकार्डधारक, 1 लाख 20 हजाराहून अधिक उत्पन्न, 65 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांचा शोध घेऊन त्यांची पेन्शन बंद केली जात आहे. अचानक पेन्शन बंद झाल्याने याबाबतची माहिती घेण्यासाठी नागरिक तहसीलदार कार्यालयात गर्दी करत आहेत. राज्य सरकारच्या संध्या सुरक्षा पेन्शन योजनेंतर्गत गेल्या काही वर्षांपासून वयोवृद्धांना दरमहा 1200 रुपये पेन्शन दिली जाते. मध्यंतरी या योजनेचा अनेकांनी गैरफायदा उठविला आहे. वय कमी असतानादेखील डॉक्टरकडून चुकीची सर्टिफिकेट घेणे, आधारकार्डमधील जन्मतारखेत फेरफार करणे असे कृत्य करून अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
यापूर्वी केवायसी न केलेल्यांची पेन्शन बंद करण्यात आली होती. तरीही अपात्र लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे, अशी माहिती मिळाली असल्याने सरकारने संबंधितांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अंत्योदय किंवा बीपीएल कार्ड असलेल्यांनाच या योजनेचा लाभ घेता येतो. मात्र, एपीएल रेशनकार्ड असलेल्यांनीही पेन्शनचा लाभ घेतला आहे. इतकेच नव्हे तर 1 लाख 20 हजारच्या आत वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. तरीही आयकर, जीएसटी परतावा भरणाऱ्यांनीही पेन्शनचा लाभ उठवला आहे. 65 वर्षे पूर्ण होणे गरजेचे असून त्यापेक्षा कमी वयाच्या नागरिकांनीही योजनेचा फायदा उठविला आहे. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेतली असून तीन महिन्यांपासून अनेकांची पेन्शन बंद झाली आहे. जे लाभार्थी योग्य कागदपत्रे सादर करत आहेत त्यांचीच पेन्शन पुन्हा सुरू केली जात आहे.