महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तपश्चर्या

06:37 AM Dec 01, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मला लहानपणी मेनका आणि तपश्चर्या करणारे ऋषी हा फोटो पाहिल्यावर खूप कौतुकास्पद वाटायचे. तपश्चर्या करणे म्हणजे जंगलात जाऊन एका विशिष्ट स्थितीत उभे राहणे किंवा अन्न त्याग करणे, अशीच एक धारणा मनामध्ये लहानपणापासून होती. पण त्याचवेळेला पुराणातल्या इतर कथा वाचतांना अनेक राक्षसांनीसुद्धा तपश्चर्या केल्याची उदाहरणं जेव्हा डोळ्यासमोर यायला लागली तेव्हा मात्र माझा खूप गोंधळ उडाला. मग तपश्चर्या म्हणजे नेमकं काय? हे समजून घेण्याचा मी प्रयत्न सुरू केला. कोणतेही काम सातत्याने केल्यावर त्याचं फळ नक्की मिळतंच. या तपाचा काळ बारा वर्षाचा असतो. ज्याला आम्ही एक तप म्हणतो अशी तपश्चर्या चांगली, वाईट, दुष्ट, सृष्ट कोणीही करू शकतात फक्त त्यात सातत्य हवे म्हणजेच ज्या कारणासाठी तपश्चर्या केली त्याचं फळ त्याच स्वरूपात निश्चित मिळतं. मग ते चांगलं असो किंवा वाईट यावरूनच बहुतेक मराठीत म्हण आली असावी ‘पेराल तसे उगवते’. नुकतीच वाचनात आलेली कथा म्हणजे एका माणसाला डोंगरावरच्या जमिनीचा तुकडा पेरणीसाठी दिला. या जमिनीपर्यंत जाण्यासाठी त्याला खूप यातायात करायला लागायची. त्यासाठी मार्ग तयार करायला हवा असं त्याच्या मनात आल्यानंतर त्याने बारा वर्ष सातत्याने हे काम करून ती टेकडी फोडून मार्ग तयार केला. यात कोणतंही अनुदान नव्हतं किंवा कोणाचीही मदत देखील नव्हती. अशावेळी केलेलं काम किंवा तपश्चर्या ही खऱ्या अर्थाने पूर्ण झाली आणि तो मार्ग तयार झाला. आम्ही मात्र आजकालची पिढी कोणतंही काम करायचं म्हटलं की आधी आम्हाला सरकारकडून काय सवलत मिळते, सरकारने हे काम कसं करावं याबद्दलच्या चर्चा सारख्या करत असतो. मुलंदेखील अमुक एक गोष्ट हवी असेल तर वडिलांनी कशी केली पाहिजे, वडिलांचे कसं कर्तव्य आहे, याबद्दलच आम्ही सतत विचार करतो. पण मी स्वत: काय केलं पाहिजे? मी स्वत: कसं वागलं पाहिजे? याबाबत मात्र कोणीही जागरूक नसतं. आजकाल एका विशिष्ट अभ्यासक्रमानंतर भरपूर पगाराच्या नोकऱ्या मिळवणाऱ्या मुलांना तपश्चर्या म्हणजे काय हे माहीतच नसतं, जे जुन्या पिढीतील लोकांनी अनुभवलंय. अनेक गोष्टींचे अनुभव घेणारे लोक जेव्हा लिहायला लागतात तेव्हा त्याच्यामागे त्यांची अनेक वर्षांची तपश्चर्या असते. वाचन करणारी माणसं उत्तम लिहू शकतात किंवा बोलू शकतात, आपले विचार बदलू शकतात, हे तपश्चर्येचंच फळ असतं आणि म्हणूनच की काय रामदासांनी सुद्धा लिहिलं ‘दिसा माझी काहीतरी लिहावे’ किंवा सातत्याने काम करावे परंतु आपल्याकडे समाजात मात्र वेगळ्या गोष्टीची तपश्चर्या करण्याची जणू चढाओढच  लागली आहे. सातत्याने खोटं बोलणं, पैसे खाणं, भ्रष्टाचार करणं आणि त्यासाठी कुणाच्याही डोक्यावर पाय देऊन वर जाणं, कोणाचेही गळे आवळणं, अशा प्रकारच्या तपश्चर्या अगदी राजरोसपणे चाललेल्या दिसतात. पूर्वीच्या काळाचे राक्षस असो नाहीतर आत्ताच्या काळाचे हे राजकारणी ह्याचे प्रतिध्वनी मात्र आपल्यापर्यंत पोहोचतात याची जाणीव त्यांना नसते. आणि आपण जे करतोय ते योग्यच करतोय, त्याच्यामागे फक्त स्वत:चाच स्वार्थ विचार असतो. समाजाचा विचार अजिबात नसतो. ज्याप्रमाणे ज्या वृक्षाच्या बिया जिथे पडतात, त्यातून त्याच वृक्षाचं रोप वर येतं, हे माहिती नसणारे लोक जगामध्ये किंग मिडाससारखे होतात. ज्याला फक्त लोभाने भ्रष्टाचाराने घेरलेलं होतं तो स्वत:च्या पलीकडे विचारच करू शकत नाही. म्हणूनच तपश्चर्येचे महत्त्व जाणायला हवं. ज्यामध्ये मनावर अंकुश ठेवून एखादं काम केलं जातं ती खरी तपश्चर्या. महादेवाच्या पिंडीवरती अभिषेकाच्या पात्रातून एक एक थेंब पाण्याचा गळत असतो आणि हा पडलेला थेंब शंकराच्या डोक्यावरती किंवा पिंडीवरती पडून तो पुढे समाज कल्याणचं काम करत असतो. असं थेंब होणं आपल्याला जमलं तर खऱ्या अर्थाने तपश्चर्या झाली असं म्हणता येईल. असे थेंब तीर्थाचे रूप घेऊन येतात. म्हणूनच पूर्वीच्या काळी वडिलांना तीर्थरूप म्हणण्याची पद्धत होती. परंतु आज मात्र सगळे अरे बाबा असेच उच्चारताना दिसतात. ही तीर्थरूपरुपी तपश्चर्याही हरवली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article