विदेशी संपत्ती, उत्पन्नाचा खुलासा न केल्यास दंड
प्राप्तिकर विभागाने केले सतर्क
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विदेशात असलेली संपत्ती किंवा विदेशात प्राप्त केलेल्या उत्पन्नाचा खुलासा स्वत:च्या प्राप्तिकर विवरणपत्रात न केल्यास करदात्यांना 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. प्राप्तिकर विभागाने रविवारी यासंबंधी करदात्यांना सतर्क केले आहे.
प्राप्तिकर विभागाने अलिकडेच सुरू करण्यात आलेल्या अनुपालन-सह-जागरुकता अभियानाच्या अंतर्गत ही माहिती दिली आहे. 2024-25 च्या निर्धारण वर्षात प्राप्तिकर विवरणपत्रात ही माहिती अवश्य नमूद करा. भारताच्या करदात्यांसाठी विदेशी बँक खाते, रोख मूल्य विमा करार किंवा एखादी कंपनी किंवा व्यवसायात आर्थिक भागीदारी, अचल संपत्ती, कस्टोडियल खाते, सभाग, कर्ज व्याज इत्यादी कुठल्याही भांडवली संपत्तीचा तपशील देणे आवश्यक असल्याचे विभागाने म्हटले आहे.
करदात्यांना स्वत:च्या प्राप्तिकर विवरणपत्रात विदेशी संपत्ती किंवा विदेशी उत्पन्न स्रोत अनुसूचीला अनिवार्य स्वरुपात भरावे लागणार आहे, भले मग त्यांचे उत्पन्न करयोग्य मर्यादेपेक्षा कमी असले तरीही असे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे. प्राप्तिकर विवरणपत्रात विदेशी संपत्ती/उत्पन्नाचा खुलासा न केल्यास काळे धन (अघोषित विदेशी उत्पन्न आणि संपत्ती) आणि कर अधिरोपण अधिनियम 2015 च्या अंतर्गत 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो असे विभागाने नमूद केले आहे.
2024-25 साठी स्वत:चे प्राप्तिकर विवरणपत्र यापूर्वीच दाखल केलेल्या करदात्यांना अभियानाच्या अंतर्गत संदेश आणि ईमेल पाठविला जाणार आहे. द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय करारांच्या अंतर्गत प्राप्त माहितीच्या माध्यमातून विदेशात संपत्ती किंवा उत्पन्न असलेल्या लोकांची ओळख पटविण्यात आली असून त्यांनाच हे मेसेज अन् ईमेल पाठविले जाणार आहेत. स्वत:च्या प्राप्तिकर विवरणपत्रात विदेशी संपत्तींचा तपशील न देणाऱ्या करदात्यांना त्यासंबंधी स्मरण करून देणे हा या अभियानाचा उद्देश असल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे. प्राप्तिकर विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे.