For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

कॅम्प परिसरात अवजड वाहनांवरआता दंडात्मक कारवाई

10:19 AM Apr 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
कॅम्प परिसरात अवजड वाहनांवरआता दंडात्मक कारवाई

500 रुपये दंड ठोठावण्याचा इशारा

Advertisement

बेळगाव : कॅम्प परिसरातील अवजड वाहतुकीला आळा घालण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ग्लोब थिएटरपासून इंडिपेंडंट रोडवर अवजड वाहतूक केल्यास कॅन्टोन्मेंट बोर्डकडून प्रत्येक वाहनाला 500 रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यामुळे यापुढे अवजड वाहनांना या मार्गाने वाहतूक करता येणार नाही. 13 मार्च रोजी झालेल्या कॅन्टोन्मेंटच्या मासिक बैठकीत कॅम्प परिसरातील अवजड वाहतुकीवर महत्त्वाची चर्चा केली. इंडिपेंडंट रोडशेजारीच सेंट जोसेफ, सेंट पॉल्स व इतर शाळा आहेत. यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांची या रोडवर गर्दी असते. या ठिकाणी अवजड वाहतुकीमुळे अनेक अपघात घडले असून लहान मुलांना जीव गमवावा लागला आहे. याबरोबरच रहिवासी वसाहतींमधून भरधाव वेगाने अवजड वाहतूक सुरू असल्याने आजूबाजूच्या घरांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

रस्ते खचत असल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डने अवजड वाहतुकीला निर्बंध घालण्यासंदर्भात चर्चा केली होती. त्यानुसार 17 मार्चपासून ग्लोब थिएटर कॉर्नर व उभा मारुती शेजारील रहदारी पोलीस स्थानकासमोर बंदूकधारी लष्करी जवानांची नेमणूक केली होती. गोगटे सर्कल येथून येणारी अवजड वाहने संचयनी सर्कलपर्यंत येऊन तेथून ती धोबीघाट कॉर्नर, हिंडलगा रोडवर वळविण्यात आली. कॅम्पमधून अवजड वाहतूक बंद करण्यासाठी ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी व सीईओ राजीव कुमार यांनी पुढाकार घेतला आहे. रात्रीच्यावेळी तसेच पहाटे इंडिपेंडंट रोडवरून अवजड वाहतूक सुरूच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डने अवजड वाहनांना 500 रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. कॅन्टोन्मेंट अॅक्ट 2006 अन्वये दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार असल्याने अवजड वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. कॅन्टोन्मेंटचे सीईओ राजीव कुमार यांनी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.