अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस : अग्रमानांकित इगा स्वायटेक, बियाट्रिझ हदाद माइया, मेदवेदेव्ह, डी मिनॉर यांना पराभवाचा धक्का
वृत्तसंस्था/न्यूयॉर्क
इटलीचा स्टार टेनिसपटू जेनिक सिनेरने अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत एकेरीची उपांत्य फेरी गाठताना रशियाच्या डॅनील मेदवेदेव्हचे आव्हान संपुष्टात आणले तर ब्रिटनच्या जॅक ड्रेपरने ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरला पराभवाचा धक्का देत शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. महिला एकेरीत अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने धक्कादायक निकाल नोंदवताना अग्रमानांकित पोलंडच्या इगा स्वायटेकचा पराभव केला. याशिवाय झेकच्या कॅरोलिना मुचोव्हानेही उपांत्य फेरीत स्थान मिळविले.
सिनेरने रशियाच्या विद्यमान विजेत्या मेदवेदेव्हवर 6-2, 1-6, 6-1, 6-4 अशी सहज मात करीत आगेकूच केली. तिसऱ्यांदा त्याने ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठली आहे. हा सामना दोन 39 मिनिटे चालला होता. चौथ्या सेटमध्ये मेदवेदेव्हने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण सिनेरने त्याला वरचढ होऊ दिले नाही. ब्रिटनच्या 25 व्या मानांकित जॅक ड्रेपरने ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरवर वर्चस्व राखत 6-3, 7-5, 6-2 असा विजय मिळविला. 2012 मध्ये ब्रिटनच्या अँडी मरेने या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. त्यानंतर ड्रेपर हा या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा पहिला ब्रिटिश खेळाडू आहे.
महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने माईलस्टोन विजय मिळविताना संभाव्य विजेत्या मानल्या जाणाऱ्या इगा स्वायटेकला स्पर्धेबाहेर घालविले. सहाव्या मानांकित पेगुलाने 6-2, 6-4 असा विजय मिळविला. कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय मिळविल्यानंतर तिने हात हवेत उंचावून जल्लोष केला आणि समर्थकांनीही विजय साजरा केला. उपांत्य फेरीत तिची लढत कॅरोलिना मुचोव्हाशी होईल. पेगुला व एम्मा नेव्हारो या दोघीनीही उपांत्य फेरी गाठली असून पुरुषांमध्येही टायफो व टेलर फ्रिट्ज यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. चार अमेरिकन खेळाडू उपांत्य फेरीत खेळण्याची ही 21 वर्षांनंतरची पहिलीच वेळ आहे.
झेकच्या मुचोव्हाने ब्राझीलच्या बियाट्रिझ हदाद माइयाची घोडदौड उपांत्यपूर्व फेरीत रोखत आगेकूच केली. मुचोव्हाने हा सामना 6-1, 6-4 असा जिंकला. पहिल्या सेटमध्ये मुचोव्हाने उत्कृष्ट फॉर्म दाखविला. माइयाला तिने केवळ एक गेम जिंकू दिला. नंतर आपल्या सर्व्हिसवर पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये माइयाच्या खेळात थोडी सुधारणा झाली. दोघींनीही ब्रेक्स मिळवित 5-3 अशी आघाडी घेतली. नंतर बिनतोड सर्व्हिस करीत सेटसह सामना संपवला.