पेगुला, बेडोसा चौथ्या फेरीत दाखल
वृत्तसंस्था/ बिजींग
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरु असलेल्या चायना खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महिलांच्या एकेरीत तृतीय मानांकित जेसिका पेगुलाने तसेच स्पेनच्या पाओला बेडोसाने चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. पुरुषांच्या विभागात इटलीच्या मुसेटिचे आव्हान संपुष्टात आले.
महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात तृतीय मानांकित पेगुलाने व्हेरोनिका कुडेरमेटोव्हाचा 6-7 (7-9), 6-1, 6-2 असा पराभव करत चौथी फेरी गाठली. पेगुलाने अलिकडच्या कालावधीत 19 पैकी 17 सामने जिंकले आहेत. 2024 च्या टेनिस हंगामात पेगुलाने टोरँटो स्पर्धा जिंकली असून तिने सिनसिनॅटी व अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र पेगुलाला अंतिम सामन्यात साबालेंकाकडून हार पत्करावी लागली होती. पेगुलाचा चौथ्या फेरीतील सामना बेडोसा बरोबर होणार आहे. 15 व्या मानांकित स्पेनच्या बेडोसाने तिसऱ्या फेरीतील सामन्यात सर्बियाच्या श्रीमेकोव्हावर 7-5, 7-5, पोलंडच्या फ्रेचने डायना स्नायडरचा 0-6, 6-3, 6-4, झेंग शुईने बेल्जियमच्या मिनेनचा 6-2, 6-3 असा पराभव केला.
पुरुष एकेरीमध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या इटलीच्या मुसेटीला बु युनचाओकेटीने 6-2, 6-4 असा पराभवाचा धक्का दिला. सातव्या मानांकित कॅचेनोव्हने अर्जेंटिनाच्या सेरुनडोलोवर 7-6 (7-4), 7-6 (9-7) असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.
टोकियोत सुरु असलेल्या एटीपी टूरवरील जपान खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत टॉमस मॅकहॅकने एकेरीची उपांत्यफेरी गाठताना अमेरिकेच्या मिचेलसनवर 7-6 (7-2), 6-3 अशी मात केली. मॅकहेक आणि हंबर्ट यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल. फ्रान्सच्या हंबर्टला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ब्रिटनच्या ड्रेपरकडून पुढे चाल मिळाली.