भारत-दक्षिण आफ्रिका पहिली टी-20 लढत आज
भारताच्या दुसऱ्या फळीतील खेळाडूंना प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने उत्तम संधी, ‘आयपीएल’ मेगा लिलावापूर्वी प्रभाव पाडण्यासही खेळाडू उत्सुक
वृत्तसंस्था/दरबान
भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या चार टी-20 सामन्यांच्या मालिकेची सुऊवात आज शुक्रवारी येथे होणार आहे. भारतीय संघ संक्रमणाच्या टप्प्यातून जात असताना संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यासारखे दुसऱ्या फळीतील तारे या प्रकारातील प्रथम पसंतीचे खेळाडू म्हणून स्वत:ला स्थापित करण्याच्या दृष्टीने या संधीचा वापर करू पाहतील. बांगलादेशविऊद्ध नुकतीच घरच्या मैदानांवर झालेली टी-20 मालिका ही एक नांदी होती. त्यात सॅमसनला सातत्याने सलामीला येण्याची संधी मिळाली आणि त्याने 47 चेंडूंत 111 धावा केल्या. टी-20 मधील रोहित शर्मानंतरच्या युगात सॅमसन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काही फलदायी खेळी करून नियमित सलामीवीर म्हणून आपला दावा आणखी मजबूत करू पाहील. अभिषेकसाठीही ही एक महत्त्वाची मालिका आहे. या धडाकेबाज डावखुऱ्या फलंदाजाने जुलैमध्ये हरारे येथे झिम्बाब्वेविऊद्ध 47 चेंडूंत शतक झळकावताना आपले प्रभावी कौशल्य दाखवलेले आहे. परंतु इतर सहा आंतरराष्ट्रीय डावांत 0, 10, 14, 16, 15, 4 अशी त्याची कामगिरी राहिली आहे.
अभिषेक आपले स्थान सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने अधिक सातत्य राखण्यास उत्सुक असेल आणि तो आपल्या डावखुऱ्या फिरकीसह अधिक भेदक बनण्याचा प्रयत्न करेल. तिलक वर्माची गोष्टही अशीच असून ऑगस्ट, 2023 मध्ये वेस्ट इंडिजविऊद्ध टी-20 कारकिर्दीची भक्कम सुऊवात केल्यानंतर हा डावखुरा फलंदाज काहीसा रडारच्या बाहेर पडला. तेव्हापासून टी-20 तील 12 सामन्यांत फक्त एक अर्धशतक त्याच्याकडून झाले आहे आणि या जानेवारीच्या सुऊवातीला अफगाणिस्तानविऊद्ध खेळल्यानंतर तो भारतीय संघात दिसलेला नाही. त्यामुळे हा हैदराबादी खेळाडू दक्षिण आफ्रिकेत काही अर्थपूर्ण प्रयत्न करून निवड समितीला प्रभावित करण्यास उत्सुक असेल. त्याने आपली ऑफस्पिनही अधिक नियमितपणे वापरण्यास सुऊवात केली आहे. या मालिकेत यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माला त्याचप्रमाणे बांगलादेशविऊद्ध पाच बळी घेऊन प्रभाव पाडलेला फिरकीपटू वऊण चक्रवर्तीलाही स्वत:ला शर्यतीत कायम ठेवण्याच्या दृष्टीने उत्तम संधी आहे. शर्माची अलीकडच्या कालावधीत काहीशी घसरण झालेली आहे.
दक्षिण आफ्रिकेविऊद्ध अर्शदीप सिंग, आवेश खान, वैशाख विजयकुमार आणि यश दयाल हा नवीन वेगवान गोलंदाजी विभाग कशी कामगिरी करतो त्यावरही निवड समिती बारकाईने लक्ष ठेवेल. अर्शदीप आणि आवेश यांनी वरिष्ठ स्तरावर काही वेळा छाप पाडलेली आहे, तर वैशाख आणि दयाल हे देशांतर्गत स्पर्धांतील आणि आयपीएलमधील त्यांच्या यशाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरावृत्ती घडविण्याचा प्रयत्न करतील. रमणदीप सिंग, ज्याला कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल, 2024 मधील फलदायी कामगिरीनंतर कायम ठेवले आहे, तो देखील येथे आपल्या यशाची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक असेल. रमणदीप हा क्रमवारीत खाली येऊन फटकेबाजी करू शकणारा धाडसी फलंदाज, उपयुक्त मध्यमगती गोलंदाज आणि प्रभावी आउटफिल्ड क्षेत्ररक्षक आहे.
कर्णधार सूर्यकुमार यादव, अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि या संघाचा भाग असलेला कसोटी संघातील एकमेव सदस्य अक्षर पटेल यासारखे संघातील वरिष्ठ खेळाडू हातून चांगली कामगिरी घडण्याची अपेक्षा करतील. त्यामुळे भारताला नुकत्याच झालेल्या घरच्या मालिकेत न्यूझीलंडविऊद्ध जो पराभव स्वीकारावा लागला त्या जखमा थोड्या भरून येऊ शकतील. वैयक्तिक स्तरावर अर्शदीप, आवेश, जितेश आणि वैशाख या चार खेळाडूंना 24 आणि 25 नोव्हेंबरच्या आयपीएल मेगा लिलावापूर्वी येथे प्रभाव पाडण्याची इच्छा असेल. कारण त्यांना त्यांच्या संबंधित संघांनी राखून ठेवलेले नाही तर संघातील इतर सर्व 11 खेळाडूंना त्यांच्या आयपीएल संघांकडून कायम ठेवण्यात आले आहे. या दोन्ही संघांची यापूर्वी जूनमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक फायनलमध्ये गाठ पडली होती. त्यात भारताकडून पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका या मालिकेत त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल.
►भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वऊण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, आवेश खान, यश दयाल.
►दक्षिण आफ्रिका : एडन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फेरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेन्रिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, नकाबा पीटर, रायन रिकेल्टन, अँडिले सिमेलेन, लुथो सिपाम्ला (तिसऱ्या आणि चौथ्या टी-20 सामन्याकरिता) आणि ट्रिस्टन स्टब्स.
सामन्याची वेळ : रात्री 8.30 वा.