पेडणेची चैतन्यमयी पुनव आज
देवस्थानांसह सरकारी सर्व यंत्रणांचीही सज्जता : लाखो भाविकांना सुरळीत दर्शनासाठी व्यवस्था
पेडणे : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवी श्रीभगवती, देव श्रीरवळनाथ व देवी श्रीसातेरी यांची पेडणेची सुप्रसिद्ध पुनव आज मंगळवार दि. 7 रोजी साजरी होत आहे. गोवा, महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातही देवी श्रीभगवती, देवी श्रीसातेरी व देव श्रीरवळनाथ यांचे कुळावी, भक्तगण लाखोंच्या संख्येने असून आपल्या देवाचा कौल घेण्यासाठी काहीजण अगोदरच पेडणेत दाखल झालेले आहेत. पेडणे शहरासह संपूर्ण तालुक्यात चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले आहे. पुनवेची सर्व तयारी पूर्ण झाली असून श्रीभगवती मंदिर परिसरात विविध प्रकारचे स्टॉल्स तसेच फुले, केळी, खेळणी, मिठाईची दुकाने, फर्निचर, भांड्यांची दुकाने, मनोरंजनाचे खेळ, चणे व खाजांची व अन्य दुकानांनी परिसर फुलून गेला आहे. मोठ्या संख्येने भाविक आपल्या देवीची खणा नारळांनी ओटी भरण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून पेडणेत दाखल होत आहेत. तसेच कौल आणि दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. आज मुख्य दिवस असल्याने संपूर्ण शहर गजबजून गेले आहे.
उत्साह, भक्तिभावाची पर्वणी
पेडणेची पुनव ही सर्व भाविकांसाठी एक उत्साह देणारी पर्वणी आहे. उत्सव यशस्वीपणे साजरा व्हावा, यासाठी सरकारी यंत्रणाही सज्ज झाली आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसबळ तैनात करण्यात आले आहे. हजारो वाहनांतून लाखो भाविक शहरात दाखल होणार असल्याने वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वाहतूक पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. पेडणेचे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक, पेडणे मामलेदार रणजित सातार्डेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे. पेडणेचे पोलिस उपअधीक्षक सलीम शेख, निरीक्षक सचिन लोकरे, वाहतूक पोलिस निरीक्षक विश्वजित चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस, वाहतूक पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पुनव उत्सवासाठी उत्तर गोव्यातील वेगवेगळ्या पोलिसस्थानकांतील पोलिसांना तसेच राखीव दलाच्या पोलिसांनाही बोलविण्यात येणार असल्याची माहिती पेडणेचे निरीक्षक सचिन लोकरे यांनी दिली.