वळसंग पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक
दक्षिण सोलापूर :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वळसंग पोलीस ठाणे येथे शांतता समिती, पोलीस पाटील आणि गावातील गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल संगले यांनी आगामी उत्सव शांततेत पार पडावा यासाठी विविध मार्गदर्शक सूचना दिल्या.
बैठकीत "एक गाव – एक गणपती", पर्यावरणपूरक गणेश मूर्ती, सांस्कृतिक उपक्रम, पारंपरिक उत्सव अशा गोष्टींना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करून लेझीम, ढोल-ताशा, टाळ, हलगी अशा पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
गणेश मंडळांसाठी सूचना मंडप उभारणी लोकांना त्रास न होईल अशा पद्धतीने करावी, २४ तास पहरेकरी नेमावेत, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, शिस्त आणि शांतता राखावी उत्कृष्ट नियोजन व शिस्तबद्ध गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचा विशेष गौरव केला जाणार असल्याचेही संगले यांनी सांगितले. सर्व गणेश मंडळांनी आणि ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावर (अक्कलकोट विभाग), वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पो. नि. अनिल संगले, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, रवीराज कांबळे तसेच विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.