रशिया-युक्रेनदरम्यान शांतता शक्य
पुतीन यांचा झेलेंस्कींना चर्चेचा प्रस्ताव : तुर्कियेत बैठक होण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनसोबत थेट चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पुतीन यांनी ही चर्चा ‘विनाविलंब’ 15 मेपासून सुरू करण्याचा विचार मांडला आहे. पुतीन यांनी तुर्कियेच्या इस्तंबुलमध्ये युक्रेनसोबत होणाऱ्या या चर्चेसाठी कुठलीच अट ठेवलेली नाही. युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर पुतीन यांच्याकडून पहिल्यांदाच अशाप्रकारचा प्रस्ताव देण्यात आला आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यात मागील 39 महिन्यांपासून (फेब्रुवारी, 2022 पासून) संघर्ष सुरु आहे. या संघर्षात दोन्ही देशांना, खासकरून युक्रेनला मोठ्या प्रमाणात जीवितहानीला सामोरे जावे लागले आहे.
रशिया गंभीर चर्चा करू इच्छितो, जेणेकरून युक्रेनसोबत संघर्षाच्या मूळ कारणांना दूर करत एका स्थायी शांततेच्या दिशेने जाता येईल असे पुतीन यांनी म्हटले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान सर कीर स्टार्मर आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या युक्रेन दौऱ्याच्या काही तासांनी पुतीन यांनी ही भूमिका मांडली आहे. या नेत्यांनी रशियाला विनाअट 30 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत होण्याचे आवाहन केले होते.
शांतता कराराची अपेक्षा
तुर्कियेच्या इस्तंबुल शहरातील चर्चेद्वारे रशिया-युक्रेनमध्ये युद्धविराम आणि शांततेवर सहमतीची शक्यता फेटाळली जाऊ शकत नाही. तत्पूर्वी तुर्कियेचे अध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगान यांच्याशी या बैठकीच्या रुपरेषेबद्दल चर्चा करणार अस्लयाचे पुतीन यांनी सांगितले आहे. तर युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांच्याकडून अद्याप या प्रस्तावावर कुठलेच उत्तर आलेले नाही.
युरोपीय देशांनी दिला होता इशारा
फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन आणि पोलांड तसेच युरोपच्या अनेक नेत्यांनी अलिकडेच युक्रेनचा दौरा करत तेथील अध्यक्ष झेलेंस्की यांची भेट घेतली आहे. 30 दिवसांचा युद्धविराम लागू न केल्यास रशियावर आणखी निर्बंध लादू असा इशारा या नेत्यांनी दिला होता. तर दबाव टाकण्याच्या रणनीतिद्वारे कुणाला काहीच साध्य होणार नाही असे रशियाने यावर म्हटले होते. परंतु पुतीन यांनी स्वत:च्या भूमिकेत बदल करत चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. आम्ही शांतता इच्छितो, परंतु युक्रेनला शस्त्रास्त्रs मिळत असून तोच युद्ध पुढे नेत आहे. स्थायी शांततेसाठी युद्धाच्या मूळ कारणांवर चर्चा आवश्यक असल्याचे पुतीन यांचे सांगणे आहे.