पीसीबी ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’साठी हायब्रिड मॉडेलला तयार
सशर्त मान्यता, अंतिम निर्णय बाकी
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, 2025 साठी हायब्रिड मॉडेल स्वीकारले आहे, परंतु त्याचबरोबर जेव्हा एखादी आंतरराष्ट्रीय स्पर्धा भारतात खेळविले जाईल तेव्हा त्यातील आपले सामनेही हायब्रिड पद्धतीने खेळवावेत, अशी अट त्यांनी ठेवली आहे. एका वृत्तानुसार, या प्रकरणी चर्चा चालू असून अजून काहीही निश्चित झालेले नाही. ‘पीसीबी’ने त्यांचा प्रस्ताव गेल्या आठवड्याच्या शेवटी आयसीसी आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबत दुबईत झालेल्या बैठकीमध्ये मांडला.
पीसीबीला 2025 च्या पलीकडे जाणारा एक असा दीर्घकालीन करार हवा आहे ज्यामध्ये आयसीसी स्पर्धांत पाकिस्तानला भारताबाहेर खेळण्याची मुभा राहील. तथापि अशा तरतुदी पुढील तीन वर्षांसाठी की, 2031 पर्यंत कराव्यात हे अद्याप ठरवले गेलेले नाही. वर्तमान टीव्ही हक्कांचा कालावधी 2031 मध्ये संपुष्टात येणार आहे.
2031 पर्यंत भारत पुऊषांच्या तीन प्रमुख स्पर्धांचे यजमानपद भूषवणार आहे. त्यात 2026 च्या फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेसह टी-20 विश्वचषक, 2029 च्या ऑक्टोबरमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2031 च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बांगलादेशसह आयसीसी क्रिकेट विश्वचषक यांचा समावेश आहे. महिला क्रिकेटच्या बाबतीत पुढील वर्षी भारत एकदिवसीय महिला विश्वचषकाचे आयोजन करणार आहे. पुढील आशिया चषक ऑक्टोबर, 2025 मध्ये नियोजित असून तो देखील भारतात होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जरी बीसीसीआयने काहीही भाष्य करणे टाळलेले असले, तरी भारतात आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांसाठी ते हायब्रिड मॉडेल स्वीकारणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत अंतिम निर्णय होण्यापूर्वी आयसीसी बोर्ड पुन्हा बैठक घेईल आणि पीसीबीने पाठवलेल्या प्रस्तावाची छाननी करेल. बीसीसीआय आणि पीसीबी या दोघांच्याही अंतिम निर्णयाला त्यांच्या देशाच्या सरकारांनी मान्य करणे आवश्यक आहे. आयसीसीने 5 डिसेंबर ही बैठकीची तारीख ठरविलेली आहे.