‘पीबीजी अलास्कन नाइट्स’ अव्वल स्थानी, ‘मुंबा’चा ‘पायपर्स’ला धक्का
वृत्तसंस्था/ लंडन
ग्लोबल चेस लीगमध्ये (जीसीएल) पीबीजी अलास्कन नाइट्स 18 गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला असून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करण्यापासून एक विजय दूर आहे. नाइट्सने आतापर्यंत सात सामन्यांत सहा विजय नोंदवले आहेत आणि ते त्रिवेणी आणि अल्पाइन एसजी पायपर्सपेक्षा सहा गुणांनी पुढे आहेत. बाद फेरी सुरू होण्यास तीन सामने बाकी असताना नाइट्स अंतिम फेरीत स्थान मिळवण्याच्या दृष्टीने सर्वांत सुस्थितीत आहेत.
त्याआधी मुंबा मास्टर्सने जेतेपदाचे दावेदार अल्पाइन एसजी पायपर्सचा पराभव करून धक्का नोंदविला. पहिल्या पटावर मॅग्नस कार्लसनच्या चुकीमुळे मॅक्झिम वॅचियर-लॅग्रेव्हला विजयाचा दावा करण्याची संधी मिळाल्याने तो निराश झाला. स्पष्टपणे नाराज दिसणारा कार्लसन नंतर तातडीने स्पर्धा स्थळाच्या बाहेर पडला. मुंबा मास्टर्सने याचा फायदा घेत 14-5 असे वर्चस्व गाजवून विजय मिळवला आणि लीगच्या आघाडीवर असलेल्या संघाच्या जवळ पोहोचण्याच्या पायपर्सच्या शक्यतांना मोठा धक्का दिला.
हाऊ यिफन आणि हम्पी कोनेरू यांच्यातील बरोबरीने या सामन्याची सुऊवात झाली, परंतु लवकरच वेग बदलला. याला पायपर्ससाठी आयकॉन बोर्डवर खेळणाऱ्या कार्लसनच्या पराभवाने सुरुवात झाली. प्रत्युत्तरादाखल, पायपर्सच्या आर. प्रज्ञानंदने विदित गुजराथीविऊद्ध जोरदार हल्ला चढवला आणि आपल्या संघाला स्पर्धेत टिकवून ठेवताना महत्त्वपूर्ण विजय मिळवला. त्यानंतर पीटर स्विडलरने रिचर्ड रॅपोर्टचा पराभव करून स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदवला. कॅटरिना लाग्नो मात्र पराभूत होता होता बचावली आणि तिने हरिका द्रोणवल्लीसोबतचा सामना बरोबरीत सोडविला. पायपर्सला शेवटचा धक्का तेव्हा बसला जेव्हा डॅनियल दार्ढाला रौनक साधवानीने एका तणावपूर्ण सामन्यात पराभूत करून मुंबा मास्टर्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दुसऱ्या सामन्यात पहिल्या मोसमातील विजेत्या त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्सचा अमेरिकन गॅम्बिट्सकडून 14-5 असा पराभव झाला. या सामन्यात अलिरेझा फिरोजाने स्पर्धेतील पहिला सामना गमावला. जगातील दुसऱ्या क्रमांकावरील खेळाडू हिकारू नाकामुराविऊद्धच्या लढतीत त्याने एंडगेममध्ये चूक केली. दिवसाच्या शेवटच्या लढतीत नाइट्सने गंगा ग्रँडमास्टर्सचा 15-4 असा पराभव करून दिवस संपला. काळे मोहरे घेऊन खेळताना नाइट्सने पराभवाने सुऊवात केली खरी, परंतु तीन पटांवर विजय मिळवत त्यांनी पटकन सामन्यावर ताबा मिळवला.