पेटीएमचा निव्वळ नफा 930 कोटींवर
मूव्ही तिकिट व्यवसायाच्या विक्रीतून 1,345 कोटींची कमाई
मुंबई :
पेटीएमची मूळ कंपनी वन97 कम्युनिकेशनने आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत 930 कोटीचा निव्वळ नफा कमावला असल्याची माहिती आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने मात्र तोटा सहन केला होता. कंपनीला मागच्या वर्षी 290.5 कोटीचा तोटा झाला होता. त्याच्या मूव्ही तिकीट व्यवसायाच्या विक्रीतून मिळालेली रक्कम वगळता, पेटीएमने तिमाहीत 415 कोटींचा तोटा नोंदवला, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत नोंदवलेल्या तोट्यापेक्षा जास्त राहिला आहे.
कंपनीने 22 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या तिमाहीतील म्हणजेच जुलै-सप्टेंबरचे निकाल जाहीर केले. वर्षाच्या आधारावर महसुलात 34 टक्क्यांची घट झाली असून महसूल 2,519 कोटींवरून 1,660 कोटींवर घसरला. पेटीएमने अलीकडेच आपला चित्रपट तिकीट व्यवसाय झोमॅटोला विकला आहे. या 1,345 कोटी रुपयांमुळे, पेटीएमने जुलै-सप्टेंबर तिमाहीत 930 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. पेटीएमला त्याच्या मूळ आर्थिक सेवांवर लक्ष केंद्रित करायचे आहे.
पेटीएमचे शेअर्स 4 टक्क्यांहून अधिक घसरले
निकाल जाहीर झाल्यानंतर पेटीएमचे शेअर्स 4 टक्क्यांहून अधिक घसरले. तो 696 रुपयांवर व्यवहार करत आहे. या शेअरने गेल्या एका महिन्यात 6.88 टक्के आणि 6 महिन्यांत 84.41 टक्के परतावा दिला आहे.