‘पेटीएम’ला नवीन युपीआय युजर्सना जोडण्यास मंजुरी
अखेर एनपीसीआयची मान्यता : आरबीआयने घातली होती बंदी
मुंबई :
अखेर नवीन युपीआय वापरकर्ते जोडण्यासाठी पेटीएमला एनपीसीआयने मान्यता दिली आहे. पेटीएमची मूळ कंपनी 97 कम्युनिकेशन्स लिमिटेडने या बाबत नुकतीच माहिती दिली आहे. युपीआय वापरकर्ते जोडण्यासाठी मंजूरी दिल्यानंतर पेटीएमचे शेअर्स सुमारे 6 टक्क्यांनी वाढले आहेत. समभाग जवळपास 730 रुपयांच्या वर व्यवहार करत आहेत.
नियमांचे पालन न केल्याने आरबीआयने पेटीएमच्या नव्या युपीआय जोडणीला बंदी घातली होती. या वर्षाच्या सुरुवातीला, आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला पेटीएम अॅपमध्ये नवीन युपीआय वापरकर्ते जोडण्यास प्रतिबंध केला होता. नियमांचे पालन न केल्याने बंदी घालण्यात आली. पेटीएमची यूपीआय सेवा पेटीएम पेमेंट्स बँकेद्वारे कार्यरत होती आणि आरबीआयच्या कारवाईनंतर, कंपनीला यूपीआय सेवा सुरू ठेवण्यासाठी इतर बँकांशी भागीदारी करावी लागली.
विजय शेखर शर्मा यांनी बंदी हटवण्याची मागणी केली
पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी 1 ऑगस्ट रोजी एनपीसीआयला हे निर्बंध हटवण्याची विनंती केली होती. एनपीसीआयच्या मंजुरीमुळे पेटीएमला त्यांच्या वापरकर्त्यांच्या संख्येत आगामी काळात वाढ करण्यास मदत होणार आहे.