पंधरा दिवसात दूसऱ्या हप्ता द्या, अन्यथा उग्र आंदोलन; माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा
मुंबई प्रतिनिधी
गत हंगाम सन 2022 -23 मधील तुटलेल्या ऊसाला दूसरा हप्ता देण्याबाबत शासनाने केलेल्या मध्यस्थीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महामार्गा रोको आंदोलन मागे घेतले होते. मात्र दूसऱ्या हप्त्याचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. पुढील पंधरा दिवसात दूसऱ्या हप्त्याबाबत निर्णय न झाल्यास शासनाने शेतकऱ्यांच्या उग्र आंदोलनास सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
माजी खादसार शेट्टी यांनी गतहंगामातील ऊसाला दूसऱ्या हप्ता देण्यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची मुंबईत भेट घेवून चर्चा केली. यावेळी त्यांनी गतहंगामात 3 हजार पेक्षा कमी दर दिलेल्या कारखान्यांनी 100 रूपये व 3 हजारापेक्षा जादा दर दिलेल्या कारखान्यांनी 50 रूपये दुसरा हप्ता देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने मान्य करून राष्ट्रीय महामार्गावरील रास्ता रोको थांबविण्यात आला होता. सहा महिने झाले कारखान्यांनी प्रस्ताव ऊस दर नियंत्रण समितीकडे सादर केला आहे. मात्र मुख्यमंत्री यांच्या दबावामुळे मुख्य सचिव बैठक लांबवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान करत आहेत.
सरकारच्या मध्यस्थीने महामार्ग रोको आंदोलन स्थगित केले होते. दोन महिन्याच्या आत ऊस उत्पादकांचे पैसे खात्यावर वर्ग करण्याबाबत मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी कबूल केले होते. सरकारने कारखान्यांना कोणतेही अर्थसहाय्य न करता कारखान्यांकडे नफ्यातील शिल्लक राहिलेले पैसे शेतकऱ्यांनी मागितले आहेत. मात्र सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा बळी घेण्यासाठी कारखानदारांची पाठराखण करून प्रस्तावास मान्यता देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्याबरोबरच रत्नागिरी- नागपूर महामार्गामधील अंकली ते चोकाक या अस्तित्वात असलेल्या पुर्वीच्या मार्गावरील भुसंपादनास चौपट मोबदला देवून भुसंपादन करण्याचा प्रस्ताव मागवून घेऊन भुसंपादन करण्यास मंत्रिमडळाच्या बैठकीत मान्यता देण्याची मागणी केली. यावेळी मुख्य सचिव सौनिक यांनी तातडीने ऊस दर नियंत्रण समितीची बैठक लावून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच रत्नागिरी - नागपूर महामार्गाचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याबाबत संबधित विभागास निर्देशीत केले.