सामाजिक योजनांची रक्कम गणेशचतुर्थीपूर्वी अदा करा
वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे बैठकीत निर्देश
पणजी : राज्य सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना सामान्य जनतेसाठी आहेत. सामान्य नागरिकांना व लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी वित्त खात्याने आता प्रत्यक्ष कार्यवाही करून येत्या गणेशचतुर्थीपूर्वी सर्व सामाजिक योजनांच्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात थकीत रक्कम भरावी, असे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. पर्वरी मंत्रालयात मुख्यमंत्री सावंत यांनी काल बुधवारी वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन गृहआधार, लाडली लक्ष्मी, दयानंद सामाजिक सुरक्षा व अन्या योजनांबाबतचा आढावा घेतला. यावेळी वित्त खात्याचे सचिव डॉ. व्ही चंदावेलू उपस्थित होते.
अधिवेशनात आला होता मुद्दा
मुख्यमंत्री म्हणाले, पावसाळी विधानसभा अधिवेशनात सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या निधीबाबत आमदारांनी मुद्दे उपस्थित केले होते. विविध योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत नसल्याचे आमदारांनी सांगितले होते. त्यानुसारच आता आढावा घेण्यात येत असून, काहीही झाले तरी येत्या गणेश चतुर्थीपूर्वी लाभार्थ्यांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करावी. गोमंतकीय जनतेला आर्थिकदृष्ट्या आधार देणाऱ्या या विविध योजना सरकारकडून राबवण्यात येत आहेत. त्या पैशांतून त्यांना जीवन जगण्यास मदत होते, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या योजनांचा लाभ लाभार्थींना किती महिन्यांपासून मिळालेला नाही याची माहिती घेऊन गणेश चतुर्थीपर्यंत सर्व लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये प्रलंबित पैसे जमा केले जातील, अशी माहिती बैठकीला उपस्थित वित्त खात्याच्या वरिष्ठ खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीपर्यंत लाभार्थींना प्रलंबित पैसे वितरित केले जातील, असेही अधिकारी म्हणाले.