पिण्याच्या पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवण्याकडे अधिक लक्ष द्या
जि. पं. सीईओ शिंदे : विविध भागात कामांची पाहणी
बेळगाव : गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवण्याकडे अधिक लक्ष द्यावे. पाण्याच्या टाक्यांची वेळोवेळी स्वच्छता करण्यात यावी तसेच जलजीवन मिशन योजनेंतर्गत शिल्लक असलेली गावातील कामे त्वरित पूर्ण करावी. जनतेला नळजोडणी करून देऊन पाणी उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना जिल्हा पंचायती मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांनी केल्या. त्यांनी बुधवारी रामदुर्ग तालुक्यातील के. चंदरगी, गुदुगोप्प व हिरेकोप्प के. एस. ग्राम पंचायत हद्दीतील चिकोप्प के. एस., भागोजीकोप्प व हुलकुंद या गावांना भेटी देऊन जलजीवन मिशन योजनेच्या कामांची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
सौंदत्ती तालुक्यातील तडसलूर, सोप्पडला व हलकी गावांना भेट देऊन तेथील जलजीवन मिशन योजना कामाबाबत ग्राम पंचायत अध्यक्ष, सदस्यांशी चर्चा केली. गोकाक तालुक्यातील कळ्ळीगुद्दी, कौजलगी, गोसबाळ, बिलकुंदी, तळकटनाळ गाम पंचायतींच्या अखत्यारितील गावांना भेटी देऊन जलजीवन मिशन योजनेंतर्गत घरांनाच्या नळजोडणीबाबत स्थानिक नागरिकांशी चर्चा केली. मुडलगी तालुक्यातील मसगुप्पी, धर्मट्टी ग्राम पंचायती व रायबाग तालुक्यातील निपनाळ, बेंडवाड ग्राम पंचायत तसेच जोडट्टी गावातील जलजीवन मिशन योजना कामाची पाहणी केली. यावेळी बेळगाव विभाग ग्रामीण पाणीपुरवठा-मलनिस्सारण खात्याचे कार्यकारी अभियंता किरण घोरपडे, ता. पं. कार्यकारी अधिकारी आनंद बडकुंद्री, बसवराज ऐनापूर, एफ. जी. चिन्ननवर, सुरेश कद्दू व अन्य अधिकारी उपस्थित होते.