नुकसानभरपाई द्या, अन्यथा जमिनी परत करा
अमदळ्ळी येथील सी-बर्ड विस्थापित भूधारकांची मागणी : कारवार येथे पत्रकार परिषद
कारवार : कारवार तालुक्यातील अरगा परिसरात सी-बर्ड नाविक प्रकल्प उभारण्यासाठी चंडिया, अरगा, अमदळ्ळी येथील शेतकऱ्यांच्या आणि इतरांच्या जमिनी ताब्यात घेऊन 25 हून अधिक वर्षांचा कालावधी लोटला आहे. तथापि ताब्यात घेण्यात आलेल्या जमिनींच्या बदल्यात अद्याप नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. तातडीने नुकसानभरपाई द्या, अन्यथा आमच्या जमिनी आम्हाला परत करा. जेणेकरून आम्ही आमच्या जमिनींवर घरे बांधू, असा इशारा अरगा, चंडिया, अमदळ्ळी येथील सी-बर्ड विस्थापित भूधारकांनी दिला आहे. ते येथील पत्रकार भवनात पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, सी-बर्ड प्रकल्प उभारणीसाठी जमीन देऊन विस्थापित झालेल्या काहींना नुकसानभरपाई देण्यात आली आहे. तर अन्य काहींना नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. संबंधितांनी नुकसानभरपाई देणे शक्य आहे की नाही ते स्पष्ट करावे.
राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी सी बर्ड प्रकल्प उभारताना विस्थापित कुटुंबातील किमान एकाला प्रकल्पाच्या सेवेत सामावून घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. आमची मुले नोकरीसाठी वणवण फिरत आहेत. तथापि प्रकल्पाच्या सेवेतील अन्य राज्यातील युवकांना सामावून घेण्यात येत आहे. याबद्दल आक्रोश व्यक्त करुन ग्रामस्थ पुढे म्हणाले, भूमालकांना नुकसान भरपाई मंजूर करण्याचा निर्णय न्यायालयाने 5 वर्षांपूर्वीच दिला आहे. सुमारे 250 कुटुंबे नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत असून काही भूमालकांनी नुकसानभरपाईची प्रतीक्षा करत या जगाचा निरोप घेतला आहे. संरक्षण खात्याने किमान आता तरी आमच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन पूर्तता करावी, अन्यथा संरक्षण मंत्रालयाच्या विरोधात उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पुढे ग्रामस्थांनी दिला. यावेळी लिलावर तांडेल, सुरेश गौड, विद्यानंद नाईक, घनश्याम गुणगा, कृष्णानंद आदी उपस्थित होते.