9 कोटी द्या, अमेरिकेचा व्हिसा मिळवा
डोनाल्ड ट्रम्प यांची ‘गोल्ड कार्ड’ सिस्टीम
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेने मोठा बदल करत नवा इमिग्रेशन प्रोग्राम सुरू केला असून याला ‘गोल्ड कार्ड’ नाव देण्यात आले आहे. याच्या अंतर्गत कुठलाही विदेशी नागरिक 10 लाख डॉलर्स अमेरिकेच्या खजिन्यात जमा करून स्थायी रहिवासी होऊ शकतो. यासंबंधीची घोषणा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी केली आहे. याचबरोबर या ‘गोल्ड कार्ड’ व्हिसासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. गोल्ड कार्ड नवा व्हिसा आधारित इमिग्रेशन कार्यक्रम असून तो अमेरिकेत कायदेशीर स्थायी वास्तव्य (ग्रीनकार्डसारखी) प्रदान करतो. या नव्या कार्यक्रमात कौटुंबिक स्पॉन्सरची गरज नाही आणि रोजगार/नियुक्तीदाराची स्पॉन्सरशिप आवश्यक नाही. हे पूर्णपणे वित्तीय योगदानावर आधारित आहे. गोल्ड कार्ड मिळविणाऱ्या अर्जदारांना पुढील काळात अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी सामान्य प्रक्रियेनुसार अर्ज करण्याचा अधिकारही मिळणार आहे.
किती खर्च येणार?
वैयक्तिक गोल्ड कार्डसाठी 10 लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास 9 कोटी रुपये द्यावे लागतील. यात 15 हजार डॉलर्सचे नॉन-रिफंडेबल प्रोसेसिंग शुल्क सामील आहे. पडताळणीनंतर ही रक्कम अमेरिकन ट्रेझरीला उपहार म्हणून जमा करावी लागते. कर्मचाऱ्याला
स्पॉन्सर करण्यासाठी कंपनीला 20 लाख
डॉलर्स प्रतिव्यक्तीच्या दराने जमा करावे लागतील. कंपन्या 20 लाख डॉलर्स अन्य कर्मचाऱ्यालाही ‘ट्रान्सफर’ करू शकतात. यासाठी 1 टक्के वार्षिक मेंटेनेन्स शुल्क आणि 5 टक्के ट्रान्सफर शुल्क द्यावे लागणार आहे. हा कार्यक्रम अर्थव्यवस्था आणि सार्वजनिक वित्त मजबूत करणार असल्याचा दावा व्हाइट हाउस करत आहेत.
गोल्ड कार्ड अन् ग्रीन कार्डमध्ये अंतर
परिवार, रोजगार, असाधारण प्रतिभा, डायवर्सिटी लॉटरी, आश्रय/शरणार्थी स्थिती किंवा गुंतवणूक आधारित नोकरी-निर्मिती मॉडेलद्वारे ग्रीनकार्डचा मार्ग खुला होतो. परंतु गोल्ड कार्डमध्ये हा नियम अत्यंत सोपा असून सरकारला मोठी रक्कम द्या आणि स्थायी वास्तव्य सुविधा मिळवा, अशी यात तरतूद आहे. ग्रीनकार्डमध्ये सरकारला थेट कोट्यावधी रुपये द्यावे लागत नाहीत. गुंतवणूक-व्हिसामध्ये देखील रक्कम व्यवसायात गुंतविली जाते. ग्रीनकार्डच्या प्रक्रियेत अनेक वर्षे लागू शकतात, जटिल दस्तऐवज, कोटा आणि दीर्घ प्रतीक्षा करावी लागते.