For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पवार विरुद्ध पवार

06:06 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
पवार विरुद्ध पवार
Advertisement

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे दिसते. त्यामुळे शरद पवार यांच्या कन्या व विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातच बारामतीत थेट लढत होण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीच्या मैदानात या दोघी परस्परांना भिडणार असल्या, तरी खरी लढत ही अजितदादा पवार विरुद्ध शरद पवार यांच्यातच होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह संबंध देशाचे या बारामतीकडे लक्ष असेल. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा बालेकिल्ला ही बारामतीची ओळख. 1967 मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून येत पवार यांनी विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर तब्बल सहा वेळा पवार यांनी येथून विजय मिळविला. 1991 मध्ये बारामतीतून लोकसभेवर निवडून गेलेल्या पवारांनी 2009 पर्यंत मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यानंतर मागच्या तीन टर्मपासून सुप्रिया सुळे या बारामतीचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. देशात कुणाचीही हवा असो. बारामतीची निवडणूक नेहमी एकतर्फीच होते, हा इतिहास आहे. मात्र, राष्ट्रवादीतील अभूतपूर्व फुटीमुळे येथील समीकरणे बदललेली दिसतात. महायुतीत ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असेल. राष्ट्रवादीकडून आमदार दत्तात्रेय भरणेंसह अन्य नावे चर्चेत असली, तरी आता ती काहीशी मागे पडली आहेत. अजितदादा आता थेट पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरविण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे येथे नणंद विऊद्ध भावजय असा सामना होऊ शकतो. सध्या सुनेत्रा पवार या मतदारसंघात चांगल्याच सक्रिय झाल्याचे पहायला मिळते. ‘एकच ध्यास, सर्वांगीण विकासाचा ध्यास’, असा उल्लेख असलेला त्यांचा चित्ररथ मतदारसंघातून फिरविला जात आहे. याशिवाय गाठीभेटींवरही त्या भर देत आहेत. मध्यंतरी कुल कुटुंबीयांची त्यांनी घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली होती. दुसऱ्या बाजूला दादांनी प्रचाराच्या मैदानात उडी घेत आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येते. सुप्रिया सुळेंवरील ‘संसदरत्न पुरस्कार’ वा तत्सम विषयांवरील टीकाटिप्पण्या असोत. माझ्याकडे बघून मतदान करा, हे आवाहन असो अथवा तर मला निवडणुकीबाबत विचार करावा लागेल, ही भावनात्मक भाषा असू देत. दादांनी चोहोबाजूंनी सुळे यांना घेरण्याचा प्रयत्न चालविल्याचे लपून राहत नाही. माझा दादा, माझा दादाचा हळवा सूर लावणाऱ्या सुप्रियाताईही या माईंड गेमला प्रत्युत्तर देऊ लागल्या असून, त्यांचा आवाज बऱ्यापैकी चढला आहे. संसदेत पर्स नव्हे, नोटपॅड लागतो. माझ्याऐवजी माझ्या नवऱ्याने भाषणे ठोकलेली तुम्हाला चालतील का, असा सवाल करीत सुनेत्रा पवार यांना लक्ष्य करण्यास त्यांनीही सुऊवात केली आहे. शिवाय त्यांचाही विकासरथ मतदारसंघात दौडू लागला आहे. त्यामुळे एरवी एकाच बाजूने वाहणारी बारामतीची हवा आता दोन्हीकडून वाहू लागल्याचे चित्र आहे. सकृतदर्शनी भाजपाची साथ व दादांचा दबदबा यामुळे बारामतीत अजित पवार यांचे पारडे किंचित जड मानले जाते. मात्र, ग्राऊंडवरची स्थिती अगदी तशी नाही. दादांच्या फटकळ स्वभावामुळे पक्षापासून दुरावलेली अनेक मंडळी शरद पवार यांना साथ देण्यासाठी पुढे सरसावलेली दिसतात. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट हा त्याचाच भाग म्हणता येईल. सहकारातील ज्येष्ठ नेते व पवारांचे कट्टर विरोधक म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंद्रराव तावरे हेही पवारांसोबत दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दादांमुळे अंतरलेल्या अशा जुन्याजाणत्यांना सोबत घेऊन बेरजेचे राजकारण करण्याचा प्रयत्न पवार करीत आहेत. त्यामुळे सुप्रियांची बाजू बळकट होताना पहायला मिळते. इंदापूरमधील हर्षवर्धन पाटील विऊद्ध अजित पवार हा संघर्ष सर्वश्रुत आहे. पाटील यांच्या कन्या अंकिता यांनी विधानसभेला जे काम करतील, त्यांनाच आम्ही लोकसभेला मदत करू, असा इशारा अजितदादांना दिला आहे. महाआघाडीत असताना अजितदादांनी तीन वेळा शब्द फिरवित फसवणूक केली. पाठीत खंजीर खुपसला, याकडे लक्ष वेधत दादांची कोंडी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी दौंडच्या कुल कुटुंबीयांची भेट घेत त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, दौंड विधानसभा निवडणुकीतील दादा समर्थक रमेशअप्पा थोरात विऊद्ध राहुल कुल यांच्यातील संघर्ष असेल किंवा लोकसभा निवडणुकीतील कांचन कुल विऊद्ध सुप्रिया सुळे हा रणसंग्राम असेल. त्यातून अजितदादा व कुल कुटुंबीयांमध्ये निर्माण झालेली दरी सांधणार का, हा प्रश्न आहे. भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे व अजित पवार यांच्यातही राजकीय वैर असून, अजितदादांमुळे आपले महत्त्वाचे पद हुकल्याचा आरोप थोपटे यांनी अलीकडेच केला होता. पुरंदरच्या संजय जगताप यांच्याशी असलेले सख्य, शिंदे गटाच्या विजय शिवतारे यांच्याशी झालेली दिलजमाई, दत्तात्रेय भरणे यांचा इंदापूर व परिसरातील प्रभाव, बारामती विधानसभा मतदारसंघावरील पकड, खडकवासला मतदारसंघातील मित्रपक्ष भाजपाची ताकद, या दादांच्या जमेच्या बाजू आहेत. हे पाहता सुप्रियांपुढे सुनेत्रा पवार या कडवे आव्हान उभे करू शकतात, असे मानण्यास जागा आहे. शरद पवारांच्या पक्षाला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. यानिमित्ताने रायगडवारी करीत पवार यांनी चिन्हाचे अनावरण करण्याचे सोपस्कार पार पडले. किंबहुना, पवार यांना इतक्या वर्षांनंतर रायगडावर जाण्यास वेळ मिळाला का, असा सवाल उपस्थित करीत विरोधकांनी त्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. तर दादा वेगवेगळ्या व्यासपीठावरून पवारांना लक्ष्य करीत आहेत. मला कुटुंबातूनही एकटे पाडले जाईल. शरद पवार हे भावनेचे राजकारण करतात, असा आरोप करतानाच मी दिलेल्या उमेदवाराला खासदार केले नाही, तर विधानसभेची निवडणूक आपण लढविणार नाही, असे सांगत अलगदपणे भावनेच्याच राजकारणाचा आधार घेतात. शिवाय मोदी-शहांशी आपली कार्यशैली कशी जुळते, हेही अधोरेखित करतात. तर शरद पवार गट अमक्याला नोकरीवरून काढण्याचा आणि त्याच्यावर दादागिरी करण्याचा उद्योग दादा गँग करीत असल्याचा पलटवार करतो. त्याचबरोबर दादांचे पुतणे युगेंद्र पवार हेही आजोबांना साथ देताना पहायला मिळतात. सत्तासंघर्षाची ही लढाई पुढच्या टप्प्यात अधिक टिपेला पोहोचू शकेल. या लढाईत मुरब्बी शरद पवार यांची तुतारी वाजणार की स्ट्रेट फॉरवर्ड अजित पवारांचे घड्याळ टायमिंग साधणार, याचे उत्तर निकालानंतरच कळू शकेल.

Advertisement

Advertisement
Tags :

.