पावल्युचेन्कोव्हा, सिलिक, सिनर, स्वायटेक, रुबलेव्ह यांची आगेकूच
ओसाका, मॅडिसन कीज, ड्रेपर, मोनफिल्स यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ लंडन
रशियाची अॅनास्तेशिया पावल्युचेन्कोव्हा, मारिन सिलिक, जेनिक सिनर, इगा स्वायटेक, बार्बरा क्रेसिकोव्हा, बेन शेल्टन, आंद्रे रुबलेव्ह, लॉरा सीगमंड यांनी येथे सुरू असलेल्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत एकेरीत आगेकूच केली तर जपानची नाओमी ओसाका, जॅक ड्रेपर, अलेक्झांडर वुकिक, मॅडिसन कीज, गेल मोनफिल्स यांचे आव्हान संपुष्टात आले.
माजी अग्रमानांकित असलेली ओसाका सध्या जागतिक क्रमवारीत 50 व्या स्थानावर असून तिने चार ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. सर्व अजिंक्यपदे ही हार्डकोर्टवरील आहेत. यूएस ओपन व ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा तिने दोनदा जिंकल्या आहेत. मात्र विम्बल्डन ग्रास कोर्टवर तिला अजूनपर्यंत अपेक्षित यश मिळविता आलेले नाही. 2017 व 2018 मध्ये तिने तिसरी फेरी गाठली होती आणि तिची आजवरची सर्वोत्तम कामगिरी होती. 21, 22 व 23 मध्ये तिने या स्पर्धेत भाग घेतला नव्हता. तिसऱ्या सेटमध्ये तिने पावल्युचेन्कोव्हाशी 4-4 अशी बरोबरी साधली होती, यावेळी पावल्युचेन्कोव्हाने शेवटचे दहापैकी 8 गुण जमवित ओसाकाचे आव्हान संपुष्टात आणले. तिने ही लढत 3-6, 6-4, 6-4 अशी जिंकली. 9 वर्षांपूर्वी तिने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर विम्बल्डनची चौथी फेरी गाठण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे.
झेकच्या 17 व्या मानांकित बार्बरा क्रेसिकोव्हाला मात्र विजयासाठी संघर्ष करावा लागला. अमेरिकेच्या कॅरोलिन डोलेहिडेवर तिने 6-4, 3-6, 6-2 अशी मात करीत तिसरी फेरी गाठली. दहाव्या मानांकित एम्मा नेव्हारोशी तिची पुढील लढत होईल. पोलंडच्या इगा स्वायटेकनेही आगेकूच केली असून दुसऱ्या फेरीत तिने अमेरिकेच्या कॅटी मॅकनालीवर 5-7, 6-2, 6-1 अशी मात केली. चार ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या असल्या तरी स्वायटेकला या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे मजल मारता आलेली नाही. तिसऱ्या फेरीत तिची लढत अमेरिकेच्याच डॅनियली कॉलिन्सशी होईल. तिसऱ्या फेरीच्या अन्य एका सामन्यात लॉरा सीगमंडने सहाव्या मानांकित मॅडिसनचे कीजचे आव्हान 6-3, 6-3 असे संपुष्टात आणले 30 व्या मानांकित लिंडा नोस्कोव्हाने कॅमिला रखिमोव्हावर 7-6 (8-6), 7-5 असा विजय मिळवित आगेकूच केली.
सिनर, सिलिक विजयी
पुरुष एकेरीत मारिन सिलिकने ग्रासकोर्टवर आजपर्यंत एकदाही टॉप पाचमधील खेळाडूला हरविले नव्हते. यावेळी त्याने चौथ्या मानांकित ब्रिटनच्या जॅक ड्रेपरचा 6-4, 6-3, 1-6, 6-4 असा पराभव करून तिसरी फेरी गाठली. सिलिकने 2014 मध्ये यूएस ओपन जिंकली होती. त्याची पुढील लढत स्पेनच्या जॉमे मुनारशी होणार आहे. अन्य एका सामन्यात जागतिक अग्रमानांकित इटलीच्या जेनिक सिनरने ऑस्ट्रेलियाच्या अलेक्सांडर वुकिकचा 6-1, 6-1, 6-3 असा धुव्वा उडविला. पहिले दोन सेट त्याने आरामात जिंकले तर तिसऱ्या सेटमध्ये वुकिकने थोडाफार प्रतिकार केला. शेवटचा गेम जिंकण्यासाठी मात्र सिनरला सहा मॅचपॉईंट्सची गरज लागली. त्याची पुढील लढत बिगरमानांकित स्पेनच्या पेड्रो मार्टिनेझशी होईल. विम्बल्डन स्पर्धा जिंकणारा इटलीचा पहिला खेळाडू होण्याचा त्याचा प्रयत्न आहे.
अन्य सामन्यात दहाव्या मानांकित बेन शेल्टनने रिन्की हिजिकाताचा 6-2, 7-5, 6-4 असा तर मार्टन फुक्सोविक्सने फ्रान्सच्या गेल मोनफिल्सचे आव्हान 6-4, 1-6, 4-6, 7-6 (7-5), 6-4 असे संपुष्टात आणत तिसरी फेरी गाठली. तिसऱ्या फेरीतील एका सामन्यात रशियाच्या 14 व्या मानांकित आंद्रे रुबलेव्हने अॅड्रियन मॅनारिनोवर 7-5, 6-2, 6-3 अशी मात केली.