रेणुकास्वामी खून प्रकरणात पवित्रा गौडाच मुख्य सूत्रधार
पोलिसांच्या रिमांड कॉपीमध्ये उल्लेख
प्रतिनिधी/ बेंगळूर
चित्रदुर्गमधील रेणुकास्वामी याच्या खून प्रकरणात अभिनेता दर्शनची प्रेयसी पवित्रा गौडा ही मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात आढळून आले. पवित्रा गौडा ही या प्रकरणातील पहिली आरोपी असून तिला न्यायालयाने गुरुवारी न्यायालयीन कोठडी दिली. ती रेणुकास्वामीच्या खुनामागील मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी नवीन रिमांड कॉपीमध्ये नमूद केले आहे.
रेणुकास्वामी याच्या प्रकरणातील आरोपी क्र. 1, 3 ते 7, 11, 12, 13 आणि 16 हे खुनासारख्या गंभीर प्रकरणात थेट सहभागी होते, असा उल्लेख पोलिसांनी रिमांड कॉपीमध्ये केला आहे.
पवित्रा गौडा हीच या कृत्याचे मुख्य कारण असून, तिने इतर आरोपींना रेणुस्वामीच्या खुनासाठी चिथावणी दिली. तसेच खुनाचा कट रचून या कृत्यात तिचा सहभाग असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. आरोपी क्र. 2 दर्शन याने कायद्याचा गैरवापर करून स्वत:चे पैसे आणि त्याच्या चाहत्यांच्या वापर करून इतर आरोपींना या कृत्यात सामील करून घेतल्याचे पुराव्यावरून दिसून आले आहे.
दर्शनने पैशांच्या बळावर आणि प्रभावी चाहत्यांचा वापर करून आरोपी क्र. 4, 6, 7, 8 यांच्यामार्फत रेणुकास्वामी याचे अपहरण केले.
रेणुकास्वामीच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतल्यानंतर पट्टणगेरे येथील आरोपी विनय (आरोपी क्र. 10) याचा नातेवाईक जयन्ना याच्या शेडमध्ये आणले. तेथे सर्वांनी मिळून रेणुकास्वामीचा अमानुषपणे मारहाण करून खून केला. आतापर्यंतच्या तपासात जमा केलेल्या भौतिक, तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांवरून या सर्व गोष्टींची पुष्टी होते. गुन्ह्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना पैशांचे आमिष दाखविले. त्यांच्यामार्फत पुरावे नष्ट केले, असा उल्लेख करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी क्र. 2, 4, 15, 16 हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. आरोपींनी खून केल्यानंतर या खुनामध्ये पैशांच्या बळावर इतर व्यक्तींचा सहभाग असल्याचे भासवून प्रकरणातून पळवाट काढण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी रिमांड कॉपीमध्ये नमूद केले आहे. प्रकरणाच्या तपासादरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या तांत्रिक पुराव्यांमध्ये आरोपींचा थेट सहभाग असल्याचे आढळून आले आहे. अनेक तांत्रिक आणि वैज्ञानिक पुरावे तपासणीसाठी पाठवले असून पुढील तपास केला जाणार आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.