For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निसर्गरम्य परिसरातील पावनक्षेत्र बडेकोळ मठ, सिद्धेश्वर मंदिर

10:46 AM Aug 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
निसर्गरम्य परिसरातील पावनक्षेत्र बडेकोळ मठ  सिद्धेश्वर मंदिर
Advertisement

दोन्ही मंदिरांचा महिमा अगाध : भक्तांच्या मनोकामना होतात पूर्ण : मठामध्ये दर महाशिवरात्रीला-श्रावण महिन्यात वर्षातून दोनवेळा होतोय रथोत्सव 

Advertisement

आण्णाप्पा पाटील/बहाद्दरवाडी 

हिरवाईने नटलेला परिसर, निसर्गरम्य वातावरणात बेळगाव शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर असणारे तारिहाळ येथील पावनक्षेत्र बडेकोळ मठ तसेच या मठापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेले गणीकोप येथील सिद्धेश्वर देवस्थान या दोन्ही देवस्थानचा महिमा अगाध आहे. प्रसिद्धीपासून दोन्हीही पावन क्षेत्र कोसो दूर आहेत. मात्र इथे येणाऱ्या श्रद्धाळू भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, असे अनेक भक्तांनी सांगितले आहे. कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा येथील लाखो भक्तांची ही श्रद्धास्थाने आहेत. राग, लोभ, मत्सर, मोह मायेने ग्रासलेल्या मनुष्याला येथे आल्यावर नक्कीच आनंदाची प्राप्ती होते. जगण्याला दिशा मिळते. लोक कल्याणासाठी, विश्व कल्याणसाठी बडेकोळ मठाचे शिवयोगी सद्गुरु नागेंद्र स्वामी यांनी या मठाची स्थापना केली आहे. शिवयोगी सद्गुरु नागेंद्र स्वामी अंतर्ज्ञानी, महायोगी होते. त्यांना साक्षात्कार झाला. भगवंत भेटीची अनुभूती झाली. त्यांनी अनेक लीला करून दाखवल्या. या मठात आलेल्या भक्तांना संकटातून तारण्याचे कार्य केले. त्यांनी केलेल्या तप साधनेमुळे ही भूमी पावन झालेली आहे. सद्गुरु नागेंद्र स्वामींनी इथे असलेल्या औदुंबर वृक्षाच्या डोलीमध्ये बसून काही काळ योग, तप साधना केली. हा वृक्ष स्वामींची निवासाची जागा होती.

Advertisement

शिवयोगी सद्गुरु नागेंद्र स्वामी यांचे पूर्वज मूळचे दिल्लीचे. शके 1926 व इसवी सन 1205 मध्ये शांतय्या स्वामी या नावाचे एक महापुऊष होऊन गेले. ते अतिशय बुद्धिमान व आंतरज्ञानी होते. शांतय्या स्वामी यांनी दिल्ली सोडल्यानंतर विविध ठिकाणी मठांची स्थापना करून मठाधिश नेमले पूजेची व्यवस्था केली. त्यांचे वंशज इसवीसन 1610 मध्ये बेळगावच्या उत्तरेला असलेल्या काकती या ठिकाणी आले. काहीजण काकती येथे स्थायिक झाले व सिद्धेश्वराची पूजा करू लागले. तसेच काहीजण संतीबस्तवाड येऊन बसवेश्वराची स्थापना करून नित्य पूजा करू लागले. आजही त्यांचे वंशज या मंदिरात पुजारी म्हणून नित्य पूजा करतात. 1707 साली शांतय्या स्वामींचे वंशज तिपय्या स्वामी हे बेळगाव जवळील तारिहाळ गावी आले. येथे राम लिंगाची पूजा करू लागले. कालांतराने मंदिराची पूजा कलय्या स्वामी म्हणजे नागेंद्र स्वामी यांचे वडील करू लागले.

कलय्या स्वामी व बाळय्या या सुशील आणि सत्वशील अशा दापत्याच्या पोटी 1850 साली नागेंद्र स्वामींचा जन्म झाला. आपल्या बालपणी त्यांनी भगवान श्रीकृष्णाप्रमाणे अनेक लीला करून दाखवल्या. बंबरगे गावातील गुऊलिंगय्या व नीलम यांची कन्या यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर काही महिन्यातच त्यांच्या आईचे निधन झाले. आईच्या निधनानंतर ते अस्वस्थ झाले. त्यांना संसारात गोडी वाटत नव्हती. त्यांना जगाच्या कल्याणासाठी गुरू भेटीची आवड निर्माण झाली होती. गृहस्थाश्रमातील आठ ते दहा वर्षात त्यांना चार मुले झाली. जनकल्याणासाठी त्यांची तळमळ वाढू लागली. त्यांच्या उतार वयात नवीनगुंद मठाचे सद्गुरु श्री नागलिंग स्वामी हे गुरुरुपाने त्यांना भेटले. नामस्मरण आणि अखंड तपश्चर्या केल्यानंतर नागेंद्र स्वामींच्या दैवी सामर्थ्याचा लोकांना अनुभव येऊ लागला.

काही वर्षानंतर स्वामीजी आपली कर्मभूमी असलेल्या सध्याच्या बडीकोळ मठाच्या ठिकाणी आले. बडेकोळ मठाचा वारसा पुढे चालवण्यासाठी दिव्यशक्ती प्राप्त असणाऱ्या नागेंद्र स्वामी यांनी संतीबस्तवाड येथील आठ वर्षीय वीरेंद्र स्वामींना 1934 साली दत्तक घेतले. मी पुन्हा वीरेंद्र स्वामी यांच्या पोटी जन्म घेणार असे सांगून कार्तिक शुद्ध त्रयोदशी दि. 24-11-1936 रोजी शिवयोगी सद्गुरु  स्वामींनी समाधी घेतली आणि तेव्हापासून या ठिकाणी पावनक्षेत्र बडीकोळ मठ स्थापण्यात आला. या पावन क्षेत्राच्या बाजूलाच एक पवित्र अशी विहीर आहे. या विहिरीला नवकोटीतीर्थ असे स्वामींनी नाव दिले आहे.

2008 पासून बडेकोळ मठात नवरात्रोत्सवात चंडिका होमला प्रारंभ

2008 पासून बडेकोळ मठात नवरात्रोत्सवात चंडिका होम करण्यास सुऊवात करण्यात आली. सन 1934 साली नागेंद्र स्वामी यांनी आपला भक्त ऊद्रगौडा  पाटील यांना एक रथ आणि पालखी बनविण्यास सांगितले. त्यानुसार अत्यंत सुंदर मजबूत असा रथ आणि पालखी अवघ्या तीन महिन्यात बनवली. मठामध्ये दर महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यात वर्षातून दोनवेळा रथोत्सव यात्रा मोठ्या उत्साहात भरते.

गनिकोप येथील सिद्धेश्वराचे पुरातन मंदिर

याच पावन क्षेत्र बडेकोळ मठापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर, तसेच बेळगाव शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर गनिकोप येथे सिद्धेश्वराचे पुरातन असे मंदिर आहे. या ठिकाणी सिद्धेश्वराची स्वयंभू स्वरूपातील पिंडी आहे. या मंदिराच्या बाजूलाच पावन असे तीर्थ कुंड आहे. या कुंडाला कोळदभावी तीर्थ कुंड असे भाविक म्हणतात. या ठिकाणी बारा महिने पाणी असते. या मंदिराच्या बाजूलाच डोंगर परिसरातून खळखळून वाहणारा नाला आहे. दगडातून वाहणारे पाणी आणि तिथला सुमधुर असा पक्षांचा किलबिलाट  पाहण्यासाठी बेळगाव व अन्य भागातील पर्यटकांची पावले या भागाकडे वळताना दिसत आहेत.

एप्रिल महिन्यात भरते यात्रा

दर सोमवारी या मंदिरात भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तसेच एप्रिल महिन्यात सिद्धेश्वराची यात्रा भरते व श्रावण महिन्याच्या शेवटच्या श्रावण सोमवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.

Advertisement
Tags :

.