महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रत्येकाच्या मनात राष्ट्रभक्ती रुजवली पाहिजे

11:05 AM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाध्यक्ष किरण ठाकुर यांची अपेक्षा : पुण्यातील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात आयोजन

Advertisement

पुणे : देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्ती ऊजविली पाहिजे. त्यातूनच देशभक्त निर्माण होऊन देशाच्या प्रगतीला आणखी चालना देता येईल, असे प्रतिपादन सहाव्या राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ‘तरुण भारत’चे सल्लागार संपादक तसेच लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष किरण ठाकुर यांनी रविवारी येथे केले. ‘कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट’च्यावतीने पुण्यातील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात आयोजिलेल्या संमेलनाचे उद्घाटन कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष प्रवीण गांधी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी संमेलनाध्यक्षपदावरून ठाकुर बोलत होते. धर्मादाय सहआयुक्त सु. मु. बुके, ब्रिगेडियर डॉ. सुनील बोधे, स्वागताध्यक्षा व साहित्यिका चंद्रलेखा बेलसरे, डॉ. स्वयंप्रभा मोहिते-पाटील, ज्येष्ठ समाजसेविका मायाताई प्रभुणे, ट्रस्टचे सर्वेसर्वा देशभक्त कोषकार चंद्रकांत शहासने, कार्याध्यक्षा अॅड. नंदिनी शहासने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी चंद्रलेखा बेलसरे यांचा ‘उर्मिलाताई कराड जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर स्मरणिकेचे प्रकाशन व संकेतस्थळाचे अनावरणही करण्यात आले.
Advertisement

संमेलनाध्यक्ष किरण ठाकुर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारतीय स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, सीमालढा, गोवा मुक्तिसंग्राम यांचा आढावा घेत विविध मुद्द्यांना स्पर्श केला. ठाकुर म्हणाले, ध्येयवेडे झाल्याशिवाय कोणतीही गोष्ट नव्याने निर्माण करता येत नाही. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रासह देशभर शिवचरित्र पोहोचविण्याचे काम केले. आज शहासने हेही ‘ओळख देशभक्तांची, शाळा तेथे क्रांतीमंदिर’ या उपक्रमातून क्रांतिकारकांचे कार्य सर्वदूर पोहोचविण्यासाठी कष्ट घेत आहेत. केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर देशभर हा राष्ट्रभक्तीचा जागर घडविणे ही काळाची गरज आहे. राष्ट्रभक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचा आदर्श घेऊन आपण राष्ट्रभक्तीची ज्योत मनामनात चेतविली पाहिजे. आजही सीमेवर आपल्या जवानांचा बळी जात आहे. प्रत्येकाच्या मनात देशप्रेम ऊजविता आले, तर देशापुढील दहशतवाद वा तत्सम कोणतेही आव्हान आपण सहजरीत्या पेलू शकू.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. बाजीराव पेशव्यांनी तब्बल 42 लढाया जिंकत दिल्लीपर्यंत धडक मारली. त्यांच्या पराक्रमाचे उदाहरण बेळगावात मराठा इन्फंट्रीतील सैनिकांना दिले जाते. एकेकाळी बेळगाव हे सत्याग्रहाचे केंद्र होते. तेथेच लोकमान्यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच,’ ही घोषणा सर्वप्रथम दिली होती. त्यानंतर न्यायालयात या सिंहगर्जनेचा उद्घोष त्यांनी केला होता. त्यातून हजारो स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा मिळाली, असे सांगून ते म्हणाले, माझे वडील बाबुराव ठाकुर यांनीही 1918 मध्ये स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. आधी स्वातंत्र्यलढा, मग संयुक्त महाराष्ट्र लढा आणि नंतर सीमालढ्याकरिता त्यांना मैदानात उतरावे लागले. ‘तरुण भारत’सारखे लढाऊ वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. काळ पुढे सरकत आहे. मात्र, अजूनही आमचा प्रश्न सुटू शकलेला नाही. आजही आम्ही बेळगाववासीय पारतंत्र्यात आहोत, अशी खंतही किरण ठाकुर यांनी या वेळी व्यक्त केली. चंद्रकांत शहासने म्हणाले, दहा हजार देशभक्तांची माहिती असलेला कोश व दोन हजार क्रांतिकारकांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे लोकार्पण करण्यासाठी आपण अभियान हाती घेतले आहे. बेळगाव, गोवा असा प्रवास करीत मुंबई येथे जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रवीण गांधी,  सु. मु. भुके, चंद्रलेखा बेलसरे, स्वयंप्रभा मोहिते-पाटील यांची समयोचित भाषणे झाली. उद्घाटनसत्रानंतर परिसंवाद रंगला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article